लोकसहभागाच्या योजनेला कोलदांडा
By Admin | Updated: May 5, 2015 00:50 IST2015-05-05T00:36:57+5:302015-05-05T00:50:03+5:30
जलयुक्त शिवारचा फज्जा : ग्रामसभा कागदोपत्रीच, लोकप्रतिनिधींची उदासीनता

लोकसहभागाच्या योजनेला कोलदांडा
तासगाव : जलयुक्त शिवार योजना हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेबाबत एक मे रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले होते. मात्र, या योजनेला ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी आणि लोकांनीच कोलदांडा दाखविल्याचे चित्र आहे. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी ग्रामसभा झाल्या नसून, बहुतांश ठिकाणी केवळ कागदोपत्रीच ग्रामसभा झालेल्या आहेत.
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून एक मे रोजी ग्रामपंचायतींमार्फत विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे आदेश शासन पातळीवरून देण्यात आले होते. या ग्रामसभेत शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेची माहिती ग्रामस्थांना समजावून सांगण्यात येणार होती.
ही योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, लोकांचा सहभाग वाढावा, सातत्याने भेडसावणारा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, पाण्याच्या बचतीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे, याबाबत सविस्तर महत्त्व पटवून देण्यासाठी आणि योजनेची प्रभावीपणे यशस्वी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायतीच्या पातळीवर लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि शासकीय योजनेच्याबाबतीत लोकांचा निरूत्साह यामुळे एक मे रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभांना लोकांनीच खो घातल्याचे दिसून आले. काही क्रियाशील गावांचा अपवाद वगळता, बहुतांश ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाल्याचे कागदी घोडे नाचविण्यात आले. अनेक ग्रामपंचायतीत सदस्यांनीच दांडी मारल्याचे दिसून येत होते, तर बहुतांश ठिकाणी नागरिकांची पुरेशी उपस्थिती नसल्यामुळे ग्रामसभांचा केवळ प्रशासकीय सोपस्कार उरकण्यात आला. (वार्ताहर)