सहकारी संस्थांची रणधुमाळी सुरू
By Admin | Updated: January 3, 2015 00:10 IST2015-01-02T23:26:48+5:302015-01-03T00:10:46+5:30
कदम-देशमुख गटात सामना : १० फेब्रुवारीपर्यंत निंवडणूक कार्यक्रम

सहकारी संस्थांची रणधुमाळी सुरू
प्रताप महाडिक :कडेगाव तालुक्यातील ‘क’ वर्गातील २३ सहकारी संस्थांच्या निवडणुका १ जानेवारी ते १0 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधित टप्प्या-टप्प्याने होत आहेत. या संस्थांच्या निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. याशिवाय ‘ब’ वर्गातील १४ सोसायट्यांची कच्ची मतदारयादी प्रसिध्द होत आहे. या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही लवकरच जाहीर होत आहे. तालुक्यात सर्वत्र या संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अपवाद वगळता सर्व सोसायट्यांमध्ये आमदार पतंगराव कदम व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या परस्परविरोधी गटामध्ये सामना रंगणार आहे.
‘क’ वर्गातील अपशिंगे, उपाळे वांगी, खंबाळे औंध, येतगाव, संपतराव देशमुख कडेपूर, येवलेवाडी, अंबिकामाता अंबक, सिध्दनाथ हिंगणगाव (खु.), वाझुबाई, चिंचणी (अंबक) सासपडे, निवृत्ती अण्णा अंबक, लोकनेते मोहनराव कदम विकास सोसायटी शाळगाव या १२ सर्व सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका १ जानेवारी ते १0 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधित होत आहेत. या निवडणुकांचा निकालही मतदानाच्या दिवशीच जाहीर होणार आहे. याशिवाय अन्य पतसंस्था, औद्योगिक सहकारी संस्था, स्वयंरोजगार संस्था, शेतीमाल प्रक्रिया संस्था, ऊस तोडणी वाहतूक संस्था अशा अन्य २१ संस्थांच्या निवडणुकाही १ जानेवारी ते १0 फेब्रुवारी याच कालावधीमध्ये होत आहेत. या संस्थांचे निकालही मतदानाच्या दिवशीच जाहीर होणार आहेत. सोसायट्या वगळता इतर ज्या २१ संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यातील बहुतांशी सर्व संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होतील.
‘ब’ वर्गातील उपाळे मायणी, सोनकिरे, नेर्ली, देवराष्ट्रे, अमरापूर, वडियेरायबाग, अंबक, सोहोली, शिरगाव, आसद, पाडळी, कुंभारगाव, हनुमान चिंचणी, शेळकबाव अशा १४ सोसायट्यांची कच्ची मतदारयादी शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी प्रसिध्द झाली आहे. यावर १0 जानेवारीपर्यंत हरकती देण्यासाठी मुदत दिली आहे. १२ जानेवारी रोजी या १२ सोसायट्यांची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे.
बिगर कर्जदार सभासदांनाही मतदानाचा हक्क
नव्या सहकार कायद्यानुसार बिगर कर्जदार सभासदांनाही मतदानाचा हक्क मिळाला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत बिगर कर्जदार सभासदास फक्त बिगर कर्जदार प्रवर्गातून उभ्या राहिलेल्या उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार होता. परंतु आता सर्व १३ जागांसाठी मतदान करण्याचा अधिकार बिगर कर्जदार सभासदांना मिळाला आहे. बिगर कर्जदार सभासद राखीव असलेल्या पाच जागांसाठी संबंधित प्रवर्गातून उमेदवारीही करू शकतात. परंतु सर्वसाधारण प्रवर्गातील आठ जागांसाठी फक्त कर्जदार सभासदच उमेदवारी करू शकतात.
१० संस्थांची निवडणूक बिनविरोध
माजी सैनिक ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (नेवरी), चौंडेश्वरी (आसद), दत्त (हिंगणगाव खुर्द), महादेव काका (रामापूर), क्रांतिसागर (कडेगाव), महालक्ष्मी महिला ग्रामीण (कडेगाव), नेताई (उपाळे मायणी), लोकनेते मोहनराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना सेवक पतसंस्था (वांगी), अभिजित कदम सोकोस्पिन सेवक पतसंस्था (कडेगाव), ज्योतिर्लिंग शेतीमाल प्रक्रिया सह. संस्था मर्या. (चिंचणी अंबक) या १० संस्थांची निवडणूक बिनविरोध झाली.