आटपाडी, सांगोला, तासगाव तालुका समन्यायी पाणी वाटपाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह कराड येथे झाली. यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सचिन पवार, कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, कार्यकारी अभियंता राजन डवरी उपस्थित होते. बैठकीत आटपाडी तालुक्यातील वंचित १२ गावांच्या बंद पाइप पद्धतीने समन्यायी पाणी वाटपाचा प्रस्ताव येत्या ऑगस्ट महिन्यात आर्थिक मंजुरीसाठी पाठविण्याचे ठरले. बंदिस्त पाइपलाइनची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि पोट वितरिकेची कामे १५ ऑगस्टपूर्वी सत्वर सुरू करण्यासाठी निर्णय घेतला जावा. कुठल्याही योजनेत समावेश नसलेली आटपाडी तालुक्यातील १२ वंचित गावे डॉ. भारत पाटणकरांच्या समन्यायी पाणी वाटपाच्या संकल्पनेमुळे आता सिंचित होणार आहेत. यावेळी आटपाडीचे आनंदराव पाटील यांच्यासोबत उपस्थित असणाऱ्या वंचित गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
सांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाचा अहवाल लवकरच मुख्य अभियंता, कृष्णा खोरे यांना सादर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यामध्ये विभागांतर्गतच्या अद्ययावत माहितीचा समावेश केला जाणार आहे. कोरोना काळात आलेल्या निर्बंधांमुळे काहीसा विलंब झाला असला तरी योग्य समन्वयातून प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी सांगोल्याचे गणेश बाबर, आटपाडीचे दादासाहेब अर्जुन, विजय मेटकरी, विजय पुजारी, मनोहर विभुते, शंकर गिड्डे आदी उपस्थित होते.