विटा पंचायत समितीचा लिपिक निलंबित; जिल्हा परिषदेकडून तडकाफडकी कारवाई

By अशोक डोंबाळे | Published: December 5, 2023 07:27 PM2023-12-05T19:27:59+5:302023-12-05T19:28:07+5:30

महिला डॉक्टरांशी गैरवर्तन अंगलट

Clerk of Vita Panchayat Samiti suspended; Hasty action by Zilla Parishad | विटा पंचायत समितीचा लिपिक निलंबित; जिल्हा परिषदेकडून तडकाफडकी कारवाई

विटा पंचायत समितीचा लिपिक निलंबित; जिल्हा परिषदेकडून तडकाफडकी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विटा (खानापूर) पंचायत समितीमधील जलसंधारण विभागातील कनिष्ठ सहायक अजय मुगूटराव माने यांनी महिला डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने मंगळवारी त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. संबंधित कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

खानापूर तालुक्यातील एका गावात महिला पशुधन विकास अधिकारी यांना म्हशीवर उपचार करण्यासाठी बोलावून घेतले. विटा पंचायत समितीमध्ये काम करीत असलेले अजय माने यांची म्हैस होती. या म्हशीवर वेळेवर उपचार करण्यासाठी त्या गावातील एका ग्रामपंचायत सदस्याने महिला पशुधन विकास अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. या गंभीर प्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सोमवारी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन धोडमिसे यांनी तातडीने विटा पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अजय माने यांना निलंबित केले आहे. तसेच खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत सदस्याला नोटीस
ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश पांडुरंग माने यांनी महिला पशुधन विकास अधिकारी पशुधनाच्या उपचारासाठी गावात आल्या होत्या. यावेळी त्यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळे गणेश माने यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ (३९/१) नुसार जिल्हा परिषदेने नोटीस बजावली आहे. नोटिसीचा खुलासा आल्यानंतर सदस्यत्व रद्दचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Clerk of Vita Panchayat Samiti suspended; Hasty action by Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.