पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकांवर वर्गोन्नत उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:10+5:302021-05-08T04:26:10+5:30
सांगली : राज्य शासनाने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर आता ‘वर्गोन्नत’ असा ...

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकांवर वर्गोन्नत उल्लेख
सांगली : राज्य शासनाने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर आता ‘वर्गोन्नत’ असा शेरा देण्यात आला आहे; परंतु एकही दिवस शाळेत न जाता उत्तीर्ण झाल्याचा विद्यार्थ्यांना आनंद झाल्याचे दिसत नाही.
कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने गेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची एकही दिवस शाळा झालेली नाही. अशातच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने थेट आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ९ व ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही हाच निर्णय घेण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर काय नोंद केली जाणार, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी उत्सुकता होती; परंतु शिक्षण विभागाने याबाबत लेखी आदेश काढून पास किंवा नापास असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार वर्गोन्नत असा शेरा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आता विद्यार्थी, पालकांना प्रत्यक्ष प्रगतीपत्रक हातात कधी पडते, याकडे लक्ष लागले आहे.
चौकट
ऑनलाइन शिक्षणाचा झाला फायदा
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची गेल्या वर्षभरात एकदाही शाळा भरली नसली तर या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाइन शिक्षण दिले आहे. तांत्रिक कारणांमुळे या ऑनलाइन शिक्षणात काही भागांत अडचणी आल्या असल्या तरी अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. अनेक शिक्षकांनी तर आपला अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. त्यामुळे या ऑनलाइन शिक्षणाचा फायदाच झाला आहे.
कोट
राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांच्या प्रगतीपत्रकावर ‘वर्गोन्नत’ असा शेरा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या संदर्भातील सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना लवकरच प्रगतीपत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी
चौकट
मुले घरात कंटाळली
कोट
कोरोनामुळे वर्षभर शाळा सुरू झाली नाही; पण गडम सर यांनी दिलेले ऑनलाइन शिक्षण व स्वाध्याय यावरच वर्गोन्नती मिळत आहे. खरे तर निकालपत्रात श्रेणीवरून आमची गुणवत्ता कळत होती. मात्र, वर्गोन्नतीचा शेरा आल्याने सर्वांना एकाच रांगेत बसावे लागले आहे.
- अजीम अत्तार, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ.
कोट
सर्वांसोबत शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती; परंतु यावर्षी शाळा सुरू झाल्याच नाहीत. वर्षभर घरात बसून कंटाळा आला आहे. शाळेत दिलेले शिक्षणच योग्य असून ऑनलाइन शिक्षण फारसे समजत नाही. एकही दिवस वर्गात न बसता पुढच्या वर्गात जात आहे, याबाबत समाधान वाटत नाही.
-अवनी उदगीरकर, सांगली.
कोट
कोरोनामुळे वर्षभर शाळेत न गेल्याने शिक्षकांकडून प्रत्यक्ष शिकवण्याचे काम झाले नाही; पण ऑनलाइन शिक्षण चालू होते. यावरच यावर्षी मी पुढच्या वर्गात गेलो; घरात बसून कंटाळा आला आहे.
-अर्णव कराळे, सांगली.
चौकट
-पहिली : ३९५२६
-दुसरी : ४२६२७
-तिसरी : ४३६५८
-चौथी : ४३६१५