शहरातील डायग्नोस्टिक सेंटरची आयुक्तांकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:26 IST2021-04-17T04:26:50+5:302021-04-17T04:26:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डायग्नोस्टिक सेंटरकडून एचआरसीटीसाठी जादा दराची आकारणी केली जात असल्याचा तक्रारी महापालिकेकडे आल्या ...

शहरातील डायग्नोस्टिक सेंटरची आयुक्तांकडून झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डायग्नोस्टिक सेंटरकडून एचआरसीटीसाठी जादा दराची आकारणी केली जात असल्याचा तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. याची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी शुक्रवारी अचानक डायग्नोस्टिक सेंटरला भेट देऊन तपासणी केली. एचआरसीटीसाठी जादा पैसे आकारल्यास कारवाईचा इशारा देत एका सेंटरला सक्त ताकीदही दिली.
कोविड रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात एचआरसीटी चाचणी केली जात आहे. तिचे दर शासनाकडून निश्चित केले आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडून सर्व चाचण्यांचा दरफलक दर्शनीस्थळी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक डायग्नोस्टिक सेंटर शासनाच्या दरापेक्षा अधिक आकारणी केली जात असल्याचा तक्रारी आल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी डायग्नोस्टिक सेंटरला अचानक भेटी देत तपासणी केली. सेंटरमधील रजिस्टर तपासून एचआरसीटीसाठी आलेल्या रुग्णांशी चर्चा केली. अक्षय डायग्नोस्टिक, आदित्य डायग्नोस्टिक आणि वेध डायग्नोस्टिकला आयुक्त कापडणीस यांनी भेट दिली. यावेळी शासन नियमांच्या दरापेक्षा अधिक आकारणी केल्याबद्दल अक्षय डायग्नोस्टिकला सक्त ताकीद देण्यात आली. शासनाच्या दरापेक्षा जादा आकारणी केल्यास सेंटरवर कारवाई करण्याचा इशाराही दिला. यावेळी वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, किरण आनंदे, किरण कोठावळे, सुरेंद्र शिंदे उपस्थित होते.
चौकट
संपर्क साधण्याचे आवाहन
एचआरसीटी करण्यासाठी येणाऱ्यांनी महापालिकेच्या फलकावरील दरानुसारचे पैसे द्यावेत. जर कोणी अतिरिक्त रक्कम मागत असेल तर महापालिकेकडे तक्रार करावी. त्या सेंटरवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त कापडणीस यांनी दिला.