महिला कर्मचाऱ्याशी चॅटिंग करणाऱ्या ‘सर्कल’ ला अभय
By Admin | Updated: August 1, 2014 00:37 IST2014-07-31T23:47:33+5:302014-08-01T00:37:40+5:30
कसलीही कारवाई नाही

महिला कर्मचाऱ्याशी चॅटिंग करणाऱ्या ‘सर्कल’ ला अभय
इस्लामपूर : वाळवा विभागातील एका मंडल अधिकाऱ्याने (सर्कल) आपल्याच हाताखालील तलाठी महिलेस व्हॉटस्अपद्वारे चॅटिंग करून त्रास दिला. याची तक्रारही संबंधित महिला कर्मचाऱ्याने तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्याकडे केली. यावर त्यांनी त्याची बदली करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता; परंतु त्याच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. बेमुदत रजेवरून तो पुन्हा हजर झाला.
गत महिन्यात या अधिकाऱ्याने त्याच्याच हाताखाली कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला तलाठ्यास अश्लील संदेश व चित्रफिती पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. याबाबत या महिला कर्मचाऱ्याने तात्काळ नातेवाईक व तहसीलदारांकडे याची तक्रार केली. याची दखल घेत सरनोबत यांनी त्याच्या बदलीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. यानंतर तो बेमुदत रजेवर गेला. सोमवार, दि. २८ जुलै रोजी पुन्हा पूर्वीच्याच जागी कामावर हजर झाला. कामावर हजर होताना त्याचा तोरा औरच होता. माझे कोणी काहीही करू शकत नाही, अशा पवित्र्यातच तो वावरत आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे.
याच मंडल अधिकाऱ्याने शिराळा भागात दारू पिऊन दंगा केला होता. या प्रकरणात त्याच्यावर बडतर्फीची कारवाईही झाली होती. या प्रकरणातूनही तो सहिसलामत सुटला आहे. त्याने कारकीर्दीत कोट्यवधींची मालमत्ता गोळा केल्याची चर्चा आहे. त्याच्या जोरावरच महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे खिसे गरम करत असतो. त्यामुळेच त्याच्यावर कोणीही कारवाई करण्यास धजावत नाही, अशीही चर्चा आहे. (वार्ताहर)