एक वर्षापर्यंतच्या बालकांचे आता न्युमोनिया प्रतिबंधक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:29+5:302021-07-07T04:32:29+5:30
सांगली : राज्यभरात शून्य ते एक वर्षे वयोगटातील बालकांना आता न्युमोनियाची लस दिली जाणार आहे. सांगली जिल्ह्यात येत्या पंधरवड्यात ...

एक वर्षापर्यंतच्या बालकांचे आता न्युमोनिया प्रतिबंधक लसीकरण
सांगली : राज्यभरात शून्य ते एक वर्षे वयोगटातील बालकांना आता न्युमोनियाची लस दिली जाणार आहे. सांगली जिल्ह्यात येत्या पंधरवड्यात लसीकरण सुरु होईल, अशी माहिती माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली.
या संदर्भातील ऑनलाईन प्रशिक्षण जिल्हा परिषदेत रविवारी झाले. जिल्ह्यात सुमारे चाळीस हजार बालकांना ही लस दिली जाणार आहे. ती इंजेक्शन स्वरुपात असून, तीन टप्प्यात दिली जाईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणूनही या लसीकरण मोहिमेकडे पाहिले जात आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाचा संसर्ग जास्त होण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. कोरोनामध्ये न्युमोनियाही बळावतो, हे लक्षात घेता त्याचे प्रतिबंधात्मक लसीकरण फायदेशीर ठरणार असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. १४ आठवडे, नऊ महिने आणि १२ ते १५ महिने या तीन टप्प्यांत न्युमोकॉकल कॉन्जुगेट लस टोचली जाईल. तिसरा डोस बुस्टर स्वरुपाचा असेल.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, सध्या बालकांना गोवर रुबेला, धनुर्वात अशा विविध लसी जन्मानंतर सहा महिने ते वर्षभरापर्यंत टोचल्या जातात. पोलिओचा डोसही पाजला जातो. त्यामध्ये शासनाने न्युमोनिया प्रतिबंधक लसीचाही समावेश केला आहे. कोरोना संसर्गामध्ये न्युमोनिया अनेकदा मृत्यूपर्यंत घेऊन जातो, हे लक्षात घेता प्रतिबंधात्मक लस जीवनदायी ठरणार आहे.