अध्यक्षांच्या बेफिकिरीने माथाडी बोर्डात अनागोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:52+5:302021-09-22T04:29:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माथाडी मंडळाच्या अध्यक्षांच्या बेफिकिरीने अनागोंदी निर्माण झाल्याचा आरोप करत हमाल पंचायतीने मंगळवारी निदर्शने ...

अध्यक्षांच्या बेफिकिरीने माथाडी बोर्डात अनागोंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माथाडी मंडळाच्या अध्यक्षांच्या बेफिकिरीने अनागोंदी निर्माण झाल्याचा आरोप करत हमाल पंचायतीने मंगळवारी निदर्शने केली. प्रलंबित विषयांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे केली.
हमाल पंचायतीचे सरचिटणीस विकास मगदूम, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर, रामचंद्र बंडगर, एमआयडीसी हमाल पंचायतप्रमुख श्रीमंत बंडगर, तोलाईदार सभेचे उपाध्यक्ष आदगोंडा गौंडाजे यांनी नेतृत्व केले.
आंदोलकांनी सांगितले की, माथाडी मंडळात पुरेशा मनुष्यबळाअभावी कामकाजावर परिणाम झाला आहे. शिराळा, इस्लामपूर, आटपाडी, मिरज, कवठेमहांकाळ, पलूस, जत कडेगावमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. मंडळ स्तरावरील उदासीनतेमुळे पूर्णवेळ निरीक्षक नियुक्त नाहीत. तीन निरीक्षकांची गरज असताना एकच कार्यरत आहे. मंडळाच्या सुमारे ६० ते ७० कोटींच्या ठेवी आहेत, पण स्वत:चा लेखापरीक्षक नसल्याने सहा-सात वर्षांत लेखापरीक्षण झालेले नाही. सर्व कामे कारकुनच करतो. कार्यालयात निवृत्त निरीक्षकांचा हस्तक्षेप वाढला आहे. रिक्त जागांवर नव्याने भरती केलेली नाही. नव्याने भरतीवेळी माथाडी कामगारांच्या पात्र मुलांना प्राधान्य देण्याची गरज आहे. मागण्यांची पूर्तता केली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
चौकट
बोर्डाच्या अध्यक्षांची निष्क्रियता
आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे की, बोर्डाचा राजीनामा दिलेल्या कामगारांना दिलेले धनादेश वटले नाहीत, त्यामुळे बॅंकांनी कामगारांना दंड केला. दंडाची रक्कम बोर्डाने देण्याची मागणी करूनही अध्यक्षांनी त्यावर निर्णय घेतला नाही. दंड प्रलंबित ठेवला. सखूबाई शेंडगे या कामगाराच्या विवादासंदर्भात सुनावणी पूर्ण होऊनही त्यावर अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही. २००१ पासूनच्या लेखापरीक्षणाची आर्थिक पत्रके वारंवार मागणी करूनही दिली नाहीत.