रुपडे बदलून महापालिकेचे सांगलीत नवे सभागृह सज्ज
By Admin | Updated: December 30, 2014 23:26 IST2014-12-30T22:33:01+5:302014-12-30T23:26:16+5:30
नव्या वर्षाची नवलाई : जानेवारीतील महासभेचे नियोजन

रुपडे बदलून महापालिकेचे सांगलीत नवे सभागृह सज्ज
सांगली : महापालिकेच्या रुपडे पालटलेल्या नवीन सभागृहाचे काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्यातील सभेसाठी आता ते सज्ज झाले आहे. किरकोळ कामे व स्वच्छतेसाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागणार असून, नव्या वर्षात हे सभागृह नव्या रुपात महापालिकेच्या सेवेत रुजू होणार आहे.
महापालिकेचे रुपडे बदलण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. नूतनीकरणाचा खर्च आता एक कोटीच्या घरात गेला आहे. महापालिका आयुक्त कार्यालय, प्रतीक्षा कक्ष, सभागृह, घड्याळ, आवार अशा सर्व गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही कामे निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. हे काम रेंगाळले. आता सरत्या वर्षाअखेरीस कामे पूर्ण होत आली असून नव्या वर्षात सभागृहासह आयुक्त कार्यालय, प्रतीक्षा कक्ष तसेच अन्य सुविधा उपलब्ध होणार आहे. नव्या वर्षातील पहिली सभा रुपडे बदललेल्या सभागृहात होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
महापालिकेच्या सभागृहातील छत, आसनव्यवस्था, खिडक्या, पंखे अशा सर्व गोष्टी बदलल्या आहेत. डागाळलेल्या भिंतींची जागा आता नव्याने रंगवलेल्या व गुळगुळीत भिंतींनी घेतली आहे. कोळीष्टकांनी भरलेल्या छताला आता प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा साज चढविण्यात आलेला आहे. अरुंद खिडक्या आणि दरवाजांमुळे अंधारात असलेल्या सभागृहाला नैसर्गिकरित्या प्रकाशमय करणाऱ्या मोठ्या खिडक्या बसविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)