जीवनशैली बदलून निसर्गाच्या जवळ जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:55+5:302021-06-21T04:18:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माणसाच्या वाढत्या गरजा भागविताना निसर्गाची हानी होत आहे. आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर आता ...

जीवनशैली बदलून निसर्गाच्या जवळ जा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माणसाच्या वाढत्या गरजा भागविताना निसर्गाची हानी होत आहे. आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर आता निसर्गाचे अस्तित्व टिकवावेच लागेल. जीवनशैली बदलून निसर्गाच्या जवळ गेल्यास माणसांचे अनेक प्रश्न सुटतील, असे मत निसर्गप्रेमी कार्यकर्त्या प्रणाली चिकटे यांनी व्यक्त केले.
प्रणाली चिकटे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर सायकलवरून पर्यावरण संवर्धन यात्रा करीत आहेत. सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात कन्या शाळेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी निसर्गाचे महत्त्व सांगून अनेक प्रश्नांवर आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली.
चिकटे म्हणाल्या की, माणसाने आपल्या गरजा वाढवल्यामुळे शेतीचे आणि निसर्गाचे प्रश्न उभे राहिले आहेत. माती-पाणी-वारा यांचे प्रदूषण आणि नवे आजार हे सारे माणसाने तयार केलेल्या प्रश्नांमुळेच झाले आहेत. यासाठी त्याची बदललेली जीवनशैली कारणीभूत असल्याचे सांगून शक्य ती कामे सायकलवरून करा, प्लॅस्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळा, झाडे लावून ती जतन करा, परिसर स्वच्छ ठेवा, पाण्याची बचत करा, असे आवाहन केले.
मुख्याध्यापिका समिता पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रणाली चिकटे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना युनिफॉर्म प्रदान करण्यात आले. दादासाहेब सरगर यांनी स्वागत कले. मोहन कोळेकर यांनी प्रास्ताविक केले.