कडेगावमध्ये शिल्लक उसाचे आव्हान
By Admin | Updated: April 3, 2015 00:36 IST2015-04-02T23:41:17+5:302015-04-03T00:36:28+5:30
कारखान्यांची दमछाक : गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

कडेगावमध्ये शिल्लक उसाचे आव्हान
प्रताप महाडिक - कडेगाव -कायम दुष्काळी कडेगाव तालुक्यात ताकारी आणि टेंभू योजनांचे पाणी आले आणि उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. दहा हजार हेक्टर क्षेत्रात अंदाजे दहा लाख टन उत्पादन एकट्या कडेगाव तालुक्यात होऊ लागले. तालुक्यातील सोनहिरा, केन अॅग्रोसह लगतच्या तालुक्यांतील कृष्णा, सह्याद्री, ग्रीन पॉवर शुगर्स, उदगिरी शुगर्स, क्रांती अशा तब्बल सात कारखान्यांना तालुक्यातील ऊस गाळपासाठी जातो. येथील शेतकरी या कारखान्यांचे सभासदही आहेत. आता ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे, तरीही तालुक्यात एक हजार हेक्टरहून अधिक ऊस शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी नोंद केलेल्या क्षेत्रातील ऊस तोडून गाळपासाठी नेण्याचे कारखान्यांसमोर आव्हान आहे. आगाऊ घेतलेली रक्कम परतफेड झाल्याने कित्येक ऊसतोड कामगारांनाही परतीचे वेध लागले आहेत.
कडेगाव तालुक्यातील २३ गावांमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. परंतु या कारखान्याने चालूवर्षी पुरेशी तोडणी व वाहतूक यंत्रणा घाटमाथ्यावर दिली नाही. यामुळे अनेक सभासदांना अन्य कारखान्याला ऊस घालावा लागला. या कारखान्याची प्रत्येक गावात केवळ एकच टोळी कार्यरत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची सोनहिरा, केन अॅग्रो, क्रांती या कारखान्यांवरही भिस्त आहे. या कारखान्यांनी नोंदीच्या तारखेप्रमाणे तोडणी कार्यक्रम राबविला. परंतु अद्याप एक हजार हेक्टरहून अधिक ऊस शिल्लक आहे. ऊसतोड कामगारांनी घेतलेली उचल परतफेड केल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे कामगार पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. यापूर्वी तीन ते चार टन गाडी आणणारे ऊसतोड कामगार आता दीड ते दोन टनाची गाडी आणत आहेत. शिवाय शेतकऱ्यांकडून २०० रुपये घेतल्याशिवाय ऊसतोड करीत नाहीत. ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे, याची जाणीव असलेले शेतकरी कारखान्यांच्या गट कार्यालयाकडे हेलपाटे घालत आहेत. काही कारखान्यांनी गळीत हंगामाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणण्यावर जोर दिला. परंतु आता कार्यक्षेत्रात नोंद असलेला शिल्लक ऊस तोडण्याचे आव्हान उभे आहे. यामुळे तोडणी यंत्रणा कार्यक्षेत्रातच कामाला लावली आहे. ऊसतोड कामगारांना परतीचे वेध लागले आहेत. उन्हाची तीव्रता जास्त आहे. यामुळे ऊसतोडीचे कामही उरकत नाही. काही कारखाने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद होत आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने आणि जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने उभ्या ऊस पिकासाठी पुरेसे पाणी नाही. यामुळे शेतकरी तात्काळ ऊसतोड मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. साखरेचे दर घसरल्याने कारखानदारी अडचणीत आहे. यामुळे नोंद असलेला ऊस तोडून हंगाम सांगता कारण्याच्या मन:स्थितीत कारखानदार आहेत.
शेती विभागाचे तोडणी कार्यक्रमाकडे बोट
ऊसतोड मिळावी यासाठी अनेक शेतकरी संबंधित कारखान्यांच्या गट कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. परंतु संबंधित कर्मचारी तोडणी कार्यक्रमाकडे बोट दाखवून थांबण्यास सांगत आहेत. काही शेतकऱ्यांनी खोट्या नोंदी घालून कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ऊस तोडून घेतल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे मात्र कार्यक्षेत्रातील नोंद असलेला संपूर्ण ऊस तोडल्याशिवाय गळीत हंगाम सांगता होणार नाही, अशी ग्वाही संबंधित कारखान्याचे पदाधिकारी देत आहेत.