अजितदादा ठरविणार जिल्हा परिषद अध्यक्ष!

By Admin | Updated: July 7, 2016 00:23 IST2016-07-06T23:48:06+5:302016-07-07T00:23:02+5:30

संघर्ष टोकाला : पाटील, शिंदे, सावंत यांना मुंबईला बोलाविले

Chairman of Zilla Parishad will decide Ajitadada! | अजितदादा ठरविणार जिल्हा परिषद अध्यक्ष!

अजितदादा ठरविणार जिल्हा परिषद अध्यक्ष!

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांना अपयश आल्यामुळे, हा वाद आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे. स्पर्धेतील तासगाव तालुक्यातील सदस्या स्नेहल पाटील, योजना शिंदे आणि कल्पना सावंत यांना गुरुवार दि. ७ रोजी मुंबईला बोलावले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी माजी गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या सूचनेनुसार तासगाव तालुक्याला अध्यक्षपद देण्याचे ठरवले होते. सध्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गटातील योजना शिंदे, येळावीतील स्नेहल पाटील आणि सावळजच्या कल्पना सावंत स्पर्धेत आहेत. योजना शिंदे मणेराजुरीतून अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना अध्यक्ष करावे, अशी आबा गटाची इच्छा आहे.
आमदार सुमनताई पाटील यांनीही पक्षाकडे शिंदे यांचेच नाव कळविले आहे. पण, अपक्षांना अध्यक्ष केले, तर भविष्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधक तो मुद्दा उचलतील, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि सदस्यांनी स्नेहल पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला होता. परंतु, आबा गटाने शिंदे यांच्या नावासाठी हट्ट धरल्यामुळे अध्यक्षपदाचा तोडगा बुधवारी निघाला नाही. कल्पना सावंत यांचेही नाव अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहे. सावंत यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. मात्र तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भविष्यातील निवडणुका लक्षात घेऊन सावंत यांना संधी देण्याची मागणी नेत्यांकडे केली आहे.
अध्यक्ष निवड शुक्रवार, दि. ८ रोजी होणार आहे. मात्र बुधवारपर्यंत राष्ट्रवादीच्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांकडून तोडगा निघाला नव्हता. प्रत्येकजण आपापल्या मतावर ठाम राहिल्यामुळे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी अजित पवार यांना तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार पवार यांनी अध्यक्षपदाच्या इच्छुक स्नेहल पाटील, योजना शिंदे, कल्पना सावंत यांना मुंबईला बोलावले आहे. दि. ७ रोजी सकाळी मुंबई येथे तीनही सदस्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे.
या बैठकीस आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी तीनही सदस्या बुधवारी सायंकाळीच मुंबईला गेल्या असून, गुरुवारी दुपारपर्यंत अध्यक्षपदाचे नाव निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
इच्छुक सदस्य : दबावतंत्र
योजना शिंदे, स्नेहल पाटील आणि कल्पना सावंत यांनी अध्यक्षपद आपल्यालाच मिळाले पाहिजे, यासाठी टोकाचे दबावतंत्र वापरले आहे. यापैकी एका गटाला अध्यक्षपदाची संधी दिल्यास दुसरा गट पक्षाच्या विरोधात जाणार आहे. याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना चिंता आहे. तसे दबावतंत्रही वापरले जात असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे. सदस्यांच्या टोकाच्या संघर्षामुळेच पदाधिकारी बदलाला विलंब झाला आहे.

Web Title: Chairman of Zilla Parishad will decide Ajitadada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.