कडधान्यांच्या उत्पादनात ६० टक्के घट
By Admin | Updated: September 6, 2015 23:13 IST2015-09-06T23:13:31+5:302015-09-06T23:13:31+5:30
दुष्काळाचा फटका : अन्य पिकांवरही परिणाम शक्य; वर्षभर दर तेजीतच राहण्याची शक्यता

कडधान्यांच्या उत्पादनात ६० टक्के घट
अशोक डोंबाळे - सांगली पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील उडीद, मूग, तुरीच्या उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांनी घट होणार आहे. याच परिस्थितीचा खरिपाच्या इतर पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. कडधान्य उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील पिके पूर्णत: वाळून गेली आहेत. परिणामी वर्षभरात कडधान्यांचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर तब्बल महिनाभराच्या खंडानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी भागातील खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. रिमझिम, तुरळक व हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून होत राहिला. परंतु त्याचा उत्पादनासाठी फारसा उपयोग झाला नाही. खरिपातील बहुतांशी पिके सध्या फुलोऱ्यात अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. पिकांची ही अवस्था महत्त्वपूर्ण समजली जाते. चार-पाच दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास दाणे भरले जाणार नाहीत अथवा दाणे भरल्यास ते बारीक राहतील. त्याचा परिणाम वजनावर पर्यायाने उत्पादनावर होणार आहे. गतवर्षी उडीद-मुगाचे हेक्टरी उत्पादनाचे उद्दिष्ट ८२७ किलो असताना प्रत्यक्षात ते ४१२ किलो झाले होते.
यंदा उद्दिष्ट ८२७ किलो अपेक्षित आहे. परंतु, ते सुमारे ४५० ते ५०० किलो एवढेच होईल, असे मत सूत्रांनी व्यक्त केले. सलग तीन वर्षे जिल्ह्यातील कडधान्याच्या उत्पादनात घट होत चालल्याचे कृषी विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
यंदा तृणधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट प्रती हेक्टरी २५६०, गळीत धान्याचे १५०० किलो अपेक्षित आहे. मात्र ते साध्य होणार नाही. पावसाने पीकवाढीच्या व आता दाणे पक्वतेच्या टप्प्यावर ओढ दिल्याने उत्पादनाची सरासरीही गाठणे कठीण होणार असून, शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका सोसावा लागेल, असा अंदाज आहे.
कृषी विभागाकडून पीकनिहाय उत्पादनात होणाऱ्या घटीचा आढावा घेतला जात आहे. अर्थात येत्या चार-पाच दिवसात पाऊस झाल्यास घट होण्याच्या प्रमाणात घट होईल, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील कडधान्यांच्या पेरणीत तीन वर्षात झालेली घट (क्षेत्र हेक्टरमध्ये)