बेळंकीतील जिल्हा परिषद शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आजपासून
By Admin | Updated: December 31, 2014 00:08 IST2014-12-31T00:07:31+5:302014-12-31T00:08:05+5:30
विविध कार्यक्रम : स्पर्धा, व्याख्याने व उपक्रमांची आखणी

बेळंकीतील जिल्हा परिषद शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आजपासून
लिंगनूर : बेळंकी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला १ जानेवारी रोजी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने जानेवारी महिन्यात भरगच्च उपक्रम व कार्यक्रमांसह शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. माजी विद्यार्थी मेळावा, विविध स्पर्धा, भव्य वृक्षलागवड, स्नेहसंमेलन, कथाकथन, महिलापालक व मातांच्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्याख्याने, परिसंवाद अशा विविध उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती बेळंकी जिल्हा परिषद शाळेच्यावतीने देण्यात आली.
बेळंकी (ता. मिरज) येथील शाळेची स्थापना ब्रिटिश काळात १ जानेवारी १८८९ रोजी झाली असल्याने यंदा १ जानेवारी २०१५ रोजी शाळेला स्थापनेपासून १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन शतकोत्तर रौप्यमहोत्सव व त्यानिमित्ताने विविध स्पर्धा, व्याख्याने व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रौप्यमहोत्सवानिमित्त बेळंकी शाळेच्या परिसरात १२५ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, तर रौप्यमहोत्सवाचे उद्घाटन १ जानेवारी रोजी, प्रभातफेरी, सायंकाळी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. ३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व महिलांच्या आरोग्यविषयक डॉ. रवींद्र आरळी यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात ३१ जानेवारीपर्यंत कथाकथन, १२५ वृक्षांचे वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचा सत्कार, आजी माजी सैनिक मेळावा, सर्व माजी विद्यार्थी व माजी शिक्षक मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे महिनाभर आयोजन करण्यात आले आहे. तर उर्वरित वर्षभर किमान महिन्यात एक उपक्रम राबविण्यात येणार आहे. (वार्ताहर)