रोकड, बॅगा पळविणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:51+5:302021-09-21T04:29:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर: शहरामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असूनसुद्धा चोरट्यांकडून दिवसाढवळ्या रोख रक्कम आणि नागरिकांच्या हातातल्या बॅगा पळवून ...

रोकड, बॅगा पळविणारी टोळी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर: शहरामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असूनसुद्धा चोरट्यांकडून दिवसाढवळ्या रोख रक्कम आणि नागरिकांच्या हातातल्या बॅगा पळवून नेण्याचे प्रकार घडत होते. चार दिवसांपूर्वी बसस्थानकाजवळील युनियन बँकेच्या समोरून रोकड लुटून दुचाकीवरून पलायन करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यात येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने यश मिळवले. तब्बल पाच दिवस या टोळीचा माग काढत अंबरनाथ-ठाणे येथील दोघांना कागल (जि. कोल्हापूर) येथे ताब्यात घेतले. न्यायालयाने दोघांना ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अजय बाबू जाधव (२१) आणि चंदरू रामू भोई (३०, दोघे रा. अंबरनाथ, ठाणे) अशी या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडील दुचाकी जप्त केली आहे. या दोघांचे बाहेरील राज्यातील गुन्हेगारांशी संपर्क असल्याचा संशय आहे. या टोळीने सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, मंगळवेढा, औरंगाबाद अशा अनेक शहरांसह कर्नाटक, राजस्थानमध्येही उच्छाद मांडला होता. इस्लामपुरात चार दिवसांपूर्वी वृद्ध व तिच्या मुलीकडील पैशांची पिशवी घेऊन चोरट्यांनी पळ काढला होता.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची छबी कैद झाली होती. या चोरीचा तातडीने तपास करण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कामाला लावले. सपोनि प्रवीण साळुंखे, हवालदार दीपक ठोंबरे, अरुण पाटील, आलमगीर लतीफ यांच्या पथकाने चोरटे गेलेल्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेत तब्बल पाच दिवस त्यांचा माग काढला. इस्लामपूरपासून किणी, वाठार, आष्टा, शिगाव, वडगाव, हातकणंगले, गोकूळ शिरगाव, कागल, कोगनोळी (कर्नाटक) आणि परत असा माग काढत कागल येथे महिनाभर भाड्याने खोली घेऊन राहिलेल्या आंध्र प्रदेश राज्यातील दोघांना ताब्यात घेत ही तपास मोहीम फत्ते केली. या कारवाईत सायबर क्राईमचे कॅप्टन गुंडेवाड आणि गोकूळ शिरगाव येथील होमगार्ड सूरज किल्लेदार यांनी मदत केली. पोलीस नाईक अरुण पाटील अधिक तपास करत आहेत.
महिनाभर मुक्काम..!
आंध्र प्रदेश राज्यातील चोरट्यांची ही टोळी विभागून राहते. ज्या गावात जातील तेथे फक्त महिनाभर भाड्याने खोली घेऊन मुक्काम ठोकायचा. त्या परिसरात हात मारल्यानंतर तेथून दुसऱ्या शहरात जायचे. त्यामुळे हे चोरटे सहजासहजी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या टोळीने राज्यातील अनेक मोठ्या शहरात दिवसाढवळ्या रोख रकमेची लुटालूट केली होती. इस्लामपूर पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या टोळीचा छडा लावला. कागल येथूनही हे चोरटे खोली सोडून दुसरीकडे पसार होण्यासाठी बसस्थानकावर आले होते.त्यावेळी पथकाने दोघांना जेरबंद केले.