खत तस्करीप्रकरणी सूत्रधाराचा शोध सुरू
By Admin | Updated: September 23, 2014 00:11 IST2014-09-22T23:07:23+5:302014-09-23T00:11:55+5:30
जिल्हा परिषद : कर्नाटकात खत पळविले

खत तस्करीप्रकरणी सूत्रधाराचा शोध सुरू
सांगली : जिल्ह्यातील सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीच्या खताची परस्पर आॅर्डर देऊन खत पळविल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रघुनाथ भोसले यांनी दिली. खत नोंदणीसाठी ज्या क्रमांकावरून दूरध्वनी आला, तो नक्की कोणाचा आहे, याचाही तपास करण्यात येणार असून, त्यानंतर सूत्रधाराचे नाव उघड होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी दोनशे पोती युरिया आणि ८० किलो १८:१८:१८ विद्राव्य खत एका मुख्य खत विक्रेत्याच्या माध्यमातून कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खटाव (ता. मिरज) येथे पकडला होता. ट्रकचालकाने सांगलीतील रेल्वेस्थानकावरून खत भरले होते. संबंधित ट्रक चालकाकडे खटाव येथील न्यू सोमेश्वर कृषी सेवा केंद्रासाठी खत देण्याचे बिल होते. खटावमध्ये ट्रक गेल्यानंतर सोमेश्वर कृषी सेवा केंद्राच्या मालकांनी संबंधित खत आपले नसल्याचे सांगितले. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. यामध्ये काही तरी गोलमाल असल्याचे लक्षात येताच कृषी विकास अधिकारी भोसले यांनी संबंधित कृषी सेवा केंद्रचालकास ट्रक तेथेच थांबवून ठेवण्याची सूचना दिली. त्यानंतर खताची तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित खत कर्नाटकात जात असल्याचे तपासणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ते खत कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामात ठेवण्यात आले आहे. ज्या क्रमांकावरून दूरध्वनी आला होता, त्याचे नाव उघड होण्यासाठीच गुन्हा दाखल करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)