सेना भवनातील निवडी ‘शिवालया’तून रद्द
By Admin | Updated: July 27, 2014 23:58 IST2014-07-27T23:49:05+5:302014-07-27T23:58:10+5:30
अंतर्गत राजकारण : नेत्यांच्या पत्रयुद्धाने स्थानिक पदाधिकाऱ्यांत गोंधळ

सेना भवनातील निवडी ‘शिवालया’तून रद्द
अविनाश कोळी- सांगली , विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच शिवसेनेच्या सांगली जिल्ह्यातील निवडीवरून गोंधळ निर्माण झाला आहे. उपजिल्हा प्रमुखपदापासून युवा सेनेच्या पदांपर्यंत अनेकांना सेना भवनातून नियुक्तीपत्रे मिळाली. स्थानिक पातळीवर सत्काराचे कार्यक्रमही उरकण्यात आले; मात्र दोनच दिवसांत पुन्हा या निवडी शिवालयातून आलेल्या पत्रांनी रद्दबातल ठरविल्या. हा गोंधळ इथेच थांबला नाही, तर ज्यांची पदे रद्द झाली त्यांना पुन्हा सेनाभवनातून फेरनियुक्तीची पत्रे मिळण्यास सुरुवात झाली आहे.
सांगली जिल्ह्यात गत आठवड्यात युवा सेना, विधानसभा क्षेत्रनिहाय पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नियुक्तीपत्रे दिली. त्यांच्या रितसर मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याची छायाचित्रे, नियुक्तीची पत्रे सोशल मीडियावरून फिरत होती. शिवसेना भवनातील जनसंपर्क अधिकारी सूरज चव्हाण यांनी एका पत्राद्वारे या निवडींचा उल्लेख केला. आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच नियुक्त्या झाल्याचे त्यांनी म्हटले होते. सांगली जिल्ह्यात अशा निवडीवरून सत्काराचे कार्यक्रमही पार पडले. दोनच दिवसांत पुन्हा या नियुक्त्या शिवालयातील पत्राने रद्द ठरविण्यात आल्या.
सांगली जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदांना स्थगिती देण्यात आली. हे पत्र पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते दिवाकर रावते यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. या नियुक्त्यांना आदित्य ठाकरेंची मान्यता घेण्यात आली नव्हती, असा उल्लेख त्यात करण्यात आला. वास्तविक आदित्य ठाकरे यांच्यासोबत सत्काराची छायाचित्रे तोपर्यंत सोशल मीडियावरून फिरत होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख गणेश निकम यांची नियुक्ती रद्दचे व खानापूर, आटपाडी येथील उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे यांना पदमुक्त करण्याचे आदेश या पत्रात होते. त्यामुळे अल्पावधितच या पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला. या गोष्टींमुळे पक्षांतर्गत राजकारणाला पुन्हा चालना मिळाली. एकमेकांवर कुरघोड्या करण्याच्या या प्रकाराची चर्चा आता शिवसैनिकांसह अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही रंगली आहे.
पत्रांचे हे युद्ध अजूनही थांबलेले नाही. शिवसेना भवनातून आणखी एक पत्र शनिवारी बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांच्याच आदेशाने पुन्हा खानापूर, आटपाडी विधानसभा क्षेत्राच्या उपजिल्हाप्रमुखपदी शिवाजी शिंदे यांची फेरनियुक्ती करण्यात आली. आ. सुभाष देसाई यांनी ही माहिती शनिवारी दिली. त्यामुळे एकाच आठवड्यात दोनवेळा नियुक्त्या आणि त्या रद्द करण्याची नामुष्की पक्षाच्या नेत्यांवर आली आहे. याला पक्षांतर्गत राजकारणच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. पक्षांतर्गत गटबाजी जिल्हाभर दिसून येते. विधानसभेच्यानिमित्ताने ती उफाळून आली आहे. बाहेरून पक्षात येण्यास इच्छुक असणाऱ्या अनेक दिग्गजांनाही विरोध करण्यात येत आहे. पक्षात कुणी वजनदार नेता येऊ नये, याची खबरदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. एकमेकांना डोईजड होणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नव्या निवडीच्या माध्यमातून शह देण्याचा उद्योगही सुरू आहे.
कार्यकर्ते मिळेनात...
सांगली जिल्ह्यात लोकांच्या प्रश्नावर कधीकाळी आक्रमक होणाऱ्या शिवसेनेला आता आंदोलनासाठी दहा कार्यकर्ते सुध्दा शोधावे लागत आहेत. अंतर्गत कुरघोड्यांमुळे आता कार्यकर्त्यांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. अशातच शिवालय व सेना भवनातील निवडींचा गोंधळ सुरू झाल्याने कार्यकर्त्यांच्या नाराजीत भर पडली आहे.