सांगली महापालिकेचा उद्या, शुक्रवारी अर्थसंकल्प, बजेट किती कोटीचे? जाणून घ्या
By शीतल पाटील | Updated: March 2, 2023 19:51 IST2023-03-02T19:50:51+5:302023-03-02T19:51:11+5:30
गतवर्षी प्रशासनाकडून ६९३.५४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते

सांगली महापालिकेचा उद्या, शुक्रवारी अर्थसंकल्प, बजेट किती कोटीचे? जाणून घ्या
सांगली : महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती, कोरोनामुळे महसुली उत्पन्नावर झालेला परिणाम, थकबाकीचे वाढलेले प्रमाण अशा परिस्थितीतही ७५० कोटींपेक्षा अधिक रकमेचा प्रस्तावित अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. आयुक्त सुनील पवार हे प्रशासनाच्या वतीने अर्थसंकल्प सादर करतील.
गतवर्षी प्रशासनाकडून ६९३.५४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. यात स्थायी समितीने ५० कोटींची वाढ केली होती. तर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आणखी २० कोटींची भर घातली होती. त्यामुळे गेल्या वर्षी बजेटने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली होती. यंदाच्या बजेटचे कामही प्रशासनाने पूर्ण केले आहे. लेखा विभागाने अंतिम निर्णयासाठी गत आठवड्यात बजेट आयुक्तांकडे सादर करण्यात आले. शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत आयुक्तांकडून यंदाचे बजेट सादर केले जाणार आहे.
गतवर्षीइतकेच ७५० कोटींच्या आसपास बजेट असल्याचे सांगण्यात येत आहे. यात काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. महसुली खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी बजेटमध्ये उपाययोजना आखल्याचे समजते. राज्य शासनाने कुपवाड ड्रेनेज योजनेला मंजुरी दिली आहे. २५० कोटीची योजनेपैकी १०० कोटीचा निधी यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेला प्राप्त होणार आहे.
याशिवाय नाट्यगृह, रस्ते, गटारी, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विकासकामांचे स्वप्न अंदाजपत्रकात रंगविण्यात आले आहे. प्रशासकडून करवाढ करण्यात आली नसली तरी उत्पन्नवाढीसाठी मालमत्तांचा जिओ सर्वेक्षणावर भर देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.