बीएसएनएलचे टॉवर सील
By Admin | Updated: December 23, 2014 00:36 IST2014-12-23T00:36:35+5:302014-12-23T00:36:35+5:30
पाणीपुरवठा तोडला : महापालिकेची कारवाई

बीएसएनएलचे टॉवर सील
सांगली : घरपट्टी विभागाने ४२ लाखांच्या थकबाकीपोटी आज (सोमवारी) स्टेशन चौकातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाचा पाणीपुरवठा तोडला. कंपनीचे टॉवरही ‘सील’ केले. त्यामुळे कंपनी अधिकाऱ्यांची दिवसभर कारवाई टाळण्यासाठी पळापळ सुरू होती. महापालिका आयुक्तांकडे त्यांनी दहा दिवसांची मुदत मागितली. दहा दिवसांच्या अटीवर महापालिकेने टॉवरचे ‘सील’ काढले व पाणीपुरवठाही सुरळीत केला.
बीएसएनएलकडील ४२ लाखांच्या घरपट्टी थकबाकीसाठी महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला. यासंदर्भात नोटिसाही बजावल्या होत्या. दोन वर्षांपासून कंपनीने घरपट्टी भरली नाही. त्यामुळे ही थकबाकी वाढतच गेली. घरपट्टी विभागाने आज सोमवारी कंपनीच्या मुख्य कार्यालयातील टॉवर सील केले. याठिकाणचा पाणीपुरवठाही तोडण्यात आला. या कारवाईमुळे अधिकाऱ्यांची गोची झाली. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी धावपळ केली. आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन दहा दिवसांत घरपट्टी जमा करण्याचे मान्य केले. आयुक्तांनी दहा दिवसांत सर्व पैसे जमा करण्याच्या अटीवर कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी सायंकाळी ‘सील’ काढून पाणीपुरवठाही सुरळीत केला.
घरपट्टी वसुलीसाठी दोनशे थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावली आहे. आठवडाभरात काही मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षातील मागणी व जुनी थकबाकी मिळून घरपट्टी विभागाला ५० कोटी रुपयांची वसुली करायची आहे. (प्रतिनिधी)