विट्यात कडकडीत बंद
By Admin | Updated: August 22, 2014 00:53 IST2014-08-22T00:47:59+5:302014-08-22T00:53:19+5:30
निषेध मोर्चा : सोशल मीडियावरील बदनामी प्रकरण

विट्यात कडकडीत बंद
विटा : सोशल मीडियावर विटा येथील एका तरुणाने कॉँग्रेसचे आमदार सदाशिवराव पाटील यांचे आक्षेपार्ह छायाचित्र पाठविल्याप्रकरणी संतप्त कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी शहरात निषेध मोर्चा काढला. शहरात कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्र पाठविणाऱ्या शहरातीलच एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला सकाळी अटक केली.
येथील एका तरुणाने कॉँग्रेसचे आ. पाटील यांचे व्हॉटस् अपवर आक्षेपार्ह छायाचित्र पाठविले होते. त्यामुळे शहरात बुधवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बुधवारी रात्री आठ वाजता माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी, नगरसेवक विशाल पाटील, अॅड. सचिन जाधव, प्रशांत कांबळे, अविनाश चोथे यांच्यासह शेकडो तरुणांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला. त्यानंतर शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. आज सकाळी दहापर्यंत संबंधितास अटक न केल्यास विटा बंदचा इशारा दिला होता. त्यामुळे आज सकाळी शहरातील हजारो तरुण आ. पाटील यांच्या निवासस्थानी एकत्रित आले. त्यावेळी आ. पाटील यांनी संयम राखण्याचा सल्ला दिला. परंतु, युवक व कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला. सकाळी १०.३० वाजता शिवाजी चौक, खानापूर रोड, कऱ्हाड रोड, मायणी रोड यासह अन्य उपनगरांतून घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. शहरात व्यापाऱ्यांनीही बंद पाळून या घटनेचा निषेध केला. (वार्ताहर)