अधिकाऱ्यासह दोघे निलंबित
By Admin | Updated: October 29, 2016 00:17 IST2016-10-29T00:15:41+5:302016-10-29T00:17:07+5:30
पोलिस प्रमुखांची कारवाई : उमदी आत्महत्या प्रकरण

अधिकाऱ्यासह दोघे निलंबित
सांगली : उमदी (ता. जत) येथील पोलिस ठाण्याच्या आवारातच संशयिताने आत्महत्या केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे व हवालदार प्रमोद रोडे (वय ३०, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली. पंधरवड्यापूर्वी हे दोघेही न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने त्यांना अटक केली होती.
उमदीत मे २०१६ मध्ये एका महिलेचा खून झाला होता. याप्रकरणी उमदी पोलिसांनी चंद्रशेखर नंदगोड यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ६ जूनला त्याने पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली होती. सीआयडीने याचा तपास केला होता. तपासात, उमदी पोलिसांनी मारहाण केल्याने तसेच डांबूून ठेवल्याने भीतीने नंदगोड याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक एन. आर. पन्हाळकर यांनी वाघमोडे, उपनिरीक्षक चिंचोळकर व रोडे यांच्याविरुद्ध डांबून ठेवणे, मारहाण करणे व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच या तिघांनी अटकेच्या भीतीने पलायन केले होते. जत न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पकडवॉरंट जारी केले होते.
वाघमोडे व रोडे सीआयडीला चार-पाच महिने गुंगारा देत फरारी राहिले. त्यामुळे सीआयडीने त्यांचा पगार व अन्य भत्ते बंद करावेत, अशी सूचना पोलिस प्रमुखांना केली होती. जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयातूनही त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. त्यामुळे पंधरवड्यापूर्वी ते जत न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर सीआयडीने त्यांना अटक केली होती. दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडीही मिळाली होती. चिंचोळकर यांची सोलापूरला बदली झाली आहे. त्यांना अद्याप अटक झालेली नाही. सीआयडीने या कारवाईचा अहवाल जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना सादर केला होता. त्यानुसार शिंदे यांनी या दोघांना निलंबित केले आहे. चिंचोळकर यांच्यावरील कारवाई सोलापूर पोलिस आयुक्त कार्यालयातून होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
पोलिस दोषीच : खातेनिहाय चौकशी
खून प्रकरणी उमदी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चंद्रशेखर नंदगोड याने पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून वाघमोडे व रोडे फरार होते. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वाघमोडे यांच्याकडे उमदी पोलिस ठाण्याचा कार्यभार होता. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पुढे जी कार्यवाही करायची असते, ते त्यांनी केली नव्हती. तसेच या खुनाचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न केले नव्हते, असा त्यांच्यावर ठपका आहे.