सांगलीतील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा कृष्णा नदीत आढळला मृतदेह
By शीतल पाटील | Updated: February 23, 2023 22:02 IST2023-02-23T22:01:57+5:302023-02-23T22:02:21+5:30
शहरातील गवळी गल्ली येथील अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती.

सांगलीतील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा कृष्णा नदीत आढळला मृतदेह
सांगली : शहरातील गवळी गल्ली येथील अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. गुरुवारी तिचा मृतदेह कृष्णा नदीतील बंधाऱ्याजवळ आढळून आला. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मुलगी आपल्या कुटुंबीयांसह गवळी गल्ली राहत होती. सोमवारी सायंकाळी सातच्या ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मंगळवारी कुटुंबीयांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला.
गुरुवारी सकाळी एका मुलीचा मृतदेह कृष्णेच्या बंधाऱ्याजवळ पाण्यावर तरंगताना परिसरातील नागरिकांना दिसला. नागरिकांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी स्पेशल रिस्क्यू फोर्सला पाचारण केले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.