भिलवडीतून बेपत्ता मुलीचा सांगलीत मृतदेह सापडला; पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल
By शरद जाधव | Updated: September 13, 2022 21:40 IST2022-09-13T21:40:13+5:302022-09-13T21:40:39+5:30
रात्री वडील घरी आल्यानंतर ती घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरु करण्यात आला होता.

भिलवडीतून बेपत्ता मुलीचा सांगलीत मृतदेह सापडला; पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भिलवडी (ता.पलूस) येथून गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह मंगळवारी सांगलीच्या सरकारी घाट परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात आढळला. मानसी संदेश चौगुले (वय १३) असे त्या मुलीचे नाव असून, मृतदेह बाहेर काढल्यानंतर केलेल्या उत्तरीय तपासणीत पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.इयत्ता सातवीत शिकण्यास असलेली मानसी कुटूंबियांसह भिलवडी येथील मधली गल्ली परिसरात राहण्यास होती. बुधवार दि. ७ रोजी रात्री ती वडीलांसोबत गणेश मंडळाच्या महाप्रसादासाठी गेली होती. तिथून ती घरी जाते सांगून गेली होती. रात्री वडील घरी आल्यानंतर ती घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरु करण्यात आला होता.
मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास शहरातील कृष्णा नदीवरील सरकारी घाटावर अज्ञात मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. नागरिकांनी याची पोलिसांना माहिती देताच, पोलिसांनी अग्निशमन दल व स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकत्य'ांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मानसी बेपत्ता असल्याची फिर्याद असल्याने पोलिसांनी तिच्या वडीलांना बोलावून घेत मृतदेह दाखवला व त्यांनी तो ओळखला. उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही कोल्हापूर प्रयोगशाळेत व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.