कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे मताधिक्य निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 16:45 IST2019-05-24T16:42:54+5:302019-05-24T16:45:18+5:30
गत लोकसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देणाºया मिरज मतदारसंघात यावेळीही खा. संजय पाटील यांना सुमारे ३० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. स्वाभिमानीचे विशाल पाटील व वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यातील तिरंगी लढतीत समीकरणे बदलल्याने

कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे मताधिक्य निर्णायक
सांगली : गत लोकसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देणाºया मिरज मतदारसंघात यावेळीही खा. संजय पाटील यांना सुमारे ३० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. स्वाभिमानीचे विशाल पाटील व वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यातील तिरंगी लढतीत समीकरणे बदलल्याने भाजपला यश मिळाल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षात मिरज तालुक्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळविणाºया भाजपने लोकसभा निवडणुकीत पुन्हा मताधिक्य मिळवून वर्चस्व राखले आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज मतदारसंघात गत लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार संजय पाटील यांना प्रतीक पाटील यांच्याविरुध्द ४६ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. मिरज पूर्व भागात माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाचे काँग्रेस कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या प्रचारात असले तरी, खा. संजय पाटील यांच्याशी मैत्रीचा भाजपला फायदा झाला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची नाराजी दूर झाल्याने विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खा. पाटील यांना मदत केल्याचे निवडणूक निकालात दिसून आले.
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका असल्याने आ. सुरेश खाडे यांनी खासदारांसोबत छुपा संघर्ष संपुष्टात आणून आ. खाडे व समर्थकांनी भाजपचे काम केले. खा. संजय पाटील यांनी मिरज पूर्व भागातील काँग्रेस व राष्टवादीतील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून, त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आणले. शहरातही महापालिका निवडणुकीत भाजपचे नगरसेवक निवडून आल्याने, त्याचाही भाजपला फायदा झाला.