भाजपच्या संजयकाकांची जयंतरावांशी जवळीक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:31+5:302021-02-16T04:28:31+5:30
संजयकाका भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागल्या आहेत. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौऱ्यात संजयकाका हे अनुपस्थित राहिले ...

भाजपच्या संजयकाकांची जयंतरावांशी जवळीक वाढली
संजयकाका भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागल्या आहेत. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौऱ्यात संजयकाका हे अनुपस्थित राहिले याचीसुद्धा अनेक उदाहरणे आहेत. जयंत पाटील यांच्या दौऱ्यावेळी संजयकाका आवर्जून उपस्थित राहतात. सोमवारी सांगलीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व आमदार, खासदारांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. कार्यक्रम पत्रिकेनुसार जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार अरुण लाड उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जि. प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे होत्या. तर शिक्षण सभापतींचाच कार्यक्रम असल्यामुळे आशा पाटील, खासदार समर्थक समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगेही उपस्थित होते. पण, उर्वरित जि. प. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार हे तीन पदाधिकारी गैरहजर राहिले. भाजपचा एकही आमदार कार्यक्रमास उपस्थित नव्हता. संजयकाका पाटील मात्र कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. व्यासपीठावर संजयकाका येताच आवर्जून जयंत पाटील यांनी आपल्या जवळ बोलवून बसवलं. व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या संजयकाकांना जयंत पाटील यांनी जवळ बोलावून बसविले. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास १५ मिनिटं चर्चा रंगली. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत तर चर्चा रंगली नव्हती ना? अशीही कार्यक्रमात चर्चा होती.
चौकट
मी भाजपशी प्रामाणिकच : संजयकाका पाटील
माझी राष्ट्रवादीशी जवळीकता नाही, गट-तट, पक्ष बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी चांगल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो. मी भाजपशी प्रामाणिक आहे. मात्र कोणी जर मी भाजपमधून बाहेर जावं, असे म्हणत असतील, तर मी त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नसल्याचे भाजपचे खा. संजयकाका पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले.