सांगली : जत विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड पुकारणाऱ्या माजी आमदार विलासराव जगताप आणि बंडखोर उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांच्यावर भाजपने कारवाई करत भाजप पक्षातून निलंबित केल्याची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी पत्र पाठवून यासंदर्भात घोषणा केली आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी आमदार विलासराव जगताप आणि इच्छुक उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बंडखोरी करून पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल करत पक्ष विरोधी भूमिका घेतली. पक्षाचे काम करताना ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले, अशा सर्वांचा अहवाल सांगलीतील जिल्हाध्यक्षांनी प्रदेश भाजपकडे पाठविला होता. त्यानुसार भाजप प्रदेश नेतृत्वाने माजी आमदार विलासराव जगताप आणि तम्मनगौडा रवी पाटील यांच्यावर कारवाई करत पक्षामधून काढल्याचे जाहीर केले आहे.विलासराव जगताप यांच्या हकालपट्टी हास्यास्पद - प्रमोद सावंत जत : माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीवेळीच भाजप पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांची आता हकालपट्टी करण्याचा उद्योग म्हणजे हास्यास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी जत येथे आयोजित पत्रकार बैठकीत केले.सावंत म्हणाले, विलासराव जगताप यांनी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलविण्याची किमया केली. भारतीय जनता पार्टीला पश्चिम महाराष्ट्रात माजी आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे चांगले दिवस आले असून, माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कार्याचे पक्षाने कधीच दखल घेत नाही अशी खंत आहे. ज्यांनी पक्षासाठी योगदान दिले त्यांच्या बाबतीत कुरघोडीचे काम भाजपच्या काही नेत्यांनी केले. २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी जगताप यांच्याविरोधात भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला त्यांना पाडण्याचे षङयंत्र रचले त्यांना मात्र पक्षात सन्मान मिळाला. याउलट लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाचे धोरण पटले नाही त्यांनी प्रथम भाजपचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा उघड प्रचार केला. विलासराव जगताप यांनी पक्षात राहून पक्षाशी कधीच गद्दारी केली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भूमिपुत्राला उमेदवारी द्या ही आग्रही भूमिका जगताप यांची होती त्यांनी उघड अपक्ष उमेदवार तमण्णगौडा रवीपाटील पाटील यांचा प्रचार केला. ज्यांनी आता हकालपट्टीचे खूळ काढले आहे. त्यांनी प्रथम आत्मचिंतन करावे, असा सल्ला सावंत यांनी दिला.
Sangli: भाजपचे विलासराव जगताप, तम्मनगौडा रवी पाटील निलंबित; हे हास्यास्पद - प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:53 IST