लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण रद्द होण्यामागे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत येथील भाजपच्या दोन गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेऊन काहीकाळ स्थानबद्ध करत सोडून दिले.
मराठा समाजाला मिळणारे आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्याचबरोबर इतर मागासवर्गीय घटकांचे राजकीय आरक्षण ही रद्द केले. याविरोधात नगराध्यक्ष व जिल्हा भाजप उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका भाजपच्या वतीने पेठ-सांगली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही व इतर मागासवर्गीय घटकांचे राजकीय आरक्षण आबाधित ठेवत नाहीत, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र करू असा इशारा वाळवा तालुका भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला.
यावेळी तालुका अध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहर अध्यक्ष अशोक खोत, मधुकर हुबाले, संदीप सावंत, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस अल्ताफ तहसीलदार यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, याच विषयावर नगरसेवक विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. विक्रम पाटील म्हणाले, राज्य शासनाने जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय करून त्यांना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन तीव्र करण्यात येईल.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार, एस. के. पाटील, ओबीसी सेलचे सरचिटणीस अल्ताफ तहसीलदार, संदीपराज पवार, सचिन कचरे, मोहन वळसे, सिकंदर नायकवडी, समीर आगा, अजय खिलारे, राजेंद्र जोंजल, योगेश गोंदकर, भास्कर पाटोळे, प्रदीप पोळ, बजरंग माने, भानुदास पाटोळे, राहुल राठोड उपस्थित होते.
फोटो- इस्लामपूर येथे भाजपमधील नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील आणि नगरसेवक विक्रम पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले.