भाजप, राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कुरघोड्या
By Admin | Updated: October 26, 2016 23:24 IST2016-10-26T23:24:22+5:302016-10-26T23:24:22+5:30
इच्छुक धास्तावले : नेत्यांसह इच्छुकांकडून ‘आॅप्शन’ची चाचपणी, नेत्यांनी कंबर कसली
भाजप, राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कुरघोड्या
दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र इच्छुकांची मांदियाळी असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीत पक्षाच्या उमेदवारीसाठी कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाल्याचे चित्र आहे. रस्सीखेच असणाऱ्या प्रभागातील इच्छुकांनी, स्वत:च्या पक्षातून उमेदवारी न मिळाल्यास, दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारीसाठी पर्यायाची चाचपणी सुरु केली आहे. तसेच ज्या प्रभागात स्वत:च्या पक्षात कमकुवत उमेदवार आहे, अशा ठिकाणी नेत्यांकडून अन्य पक्षातील विनिंंग उमेदवारांना आॅफर देण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या फडात चांगलाच रंग भरला असून, इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून जोरदार मार्चेबांधणी सुरु आहे. पालिकेचा फड जिंकण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. नेत्यांबरोबरच इच्छुकांनीही कामाला सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांकडून मुलाखतीचे सोपस्कार पार पाडण्यात आले आहेत. मात्र अपवाद वगळता बहुतांश सर्वच प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. आरक्षणामुळे अनेक नवखे चेहरे इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल, याची खात्री कोणत्याच इच्छुकाला देता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकाच पक्षातील प्रतिस्पर्धी इच्छुकाचा पत्ता कट होऊन, स्वत:ची किंवा मर्जीतील उमेदवाराची पक्षाकडे वर्णी लागावी, यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात कुरघोड्यांचे राजकारण सुरु आहे. या कुरघोड्यांमुळे नेत्यांकडून सावध भूमिका घेतली जात असून, सर्वांनाच गोंजारण्याचे काम सद्यस्थितीत सुरु आहे.
तासगाव शहरातील दहा प्रभागांपैकी तीन प्रभागात वरचे गल्लीचा समावेश आहे. या प्रभागातून उमेदवारीसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुुरु आहे. वरचे गल्लीत पाटलांची मोठी व्होट बँक आहे. याठिकाणी उमेदवारीसाठी पाटीलविरोधात पाटीलेतर उमेदवार निश्चित करण्यासाठी चढाओढ सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतून उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठीचया ठिकाणी कुरघोड्या सुरु आहेत. या कुरघोड्या ऐन निवडणुकीच्या धामधुमीत डोकेदुखी ठरण्याची शक्यताही नाकारत येत नाही. या सर्व घडामोडींमुळे इच्छुक मात्र धास्तावल्याचे दिसून येत आहे.
मर्जीतल्या वर्णीसाठी पदाधिकाऱ्यांचे लॉबिंग
भाजप आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी होत असताना, दोन्ही पक्षांतील (विशेषत: भाजपच्या) काही पदाधिकाऱ्यांकडून स्वत:च्या मर्जीतल्या इच्छुकांच्या गळ्यात पक्षाची उमेदवारी पडावी, यासाठी लॉबिंग केले जात आहे. त्यासाठी व्होट बॅँक असणाऱ्या गटाच्या, समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडे उमेदवारीसाठी शिफारस करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. काही प्रभागात एकाच घरातून दोन-तीन इच्छुक आहेत. या इच्छुकांत आजी-माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश असून, एक तरी उमेदवारी पदरात पाडून घेता यावी, यासाठी आटापिटा सुरू असल्याचे चित्र आहे.
इच्छुकांना आॅफर; नाराजीचे सावट
राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या काही प्रभागात राष्ट्रवादीतून इच्छुक असणाऱ्या काही उमेदवारांना भाजपच्या नेत्यांकडून उमेदवारीसाठी थेट आॅफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे. या आॅफरमुळे राष्ट्रवादीच्या गोटात फुटीचे सावट निर्माण झाले आहे, तर भाजपमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रभागात मशागत करणाऱ्या इच्छुकांच्यात मात्र या आॅफरच्या चर्चेने नाराजी जाणवत असून, उमेदवारीसाठी अशा इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. तर भाजपचे प्राबल्य असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून तोडीस तोड उमेदवारी देण्यासाठी यंत्रणा राबवली जात आहे. तर काँग्रेसकडून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कुरघोड्यांचा फायदा घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे.