Sangli Municipal Corporation Election: महाविकास आघाडीत शांतता, जयंतराव ‘चाचपणी’त व्यस्त!
By अशोक डोंबाळे | Updated: December 11, 2025 18:38 IST2025-12-11T18:38:17+5:302025-12-11T18:38:52+5:30
आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्याचे आव्हान, काँग्रेस-उद्धवसेना शांतच

Sangli Municipal Corporation Election: महाविकास आघाडीत शांतता, जयंतराव ‘चाचपणी’त व्यस्त!
अशोक डोंबाळे
सांगली : महानगरपालिका निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे; पण महाविकास आघाडीमध्ये अद्याप शांतता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रभागातील उमेदवारीची चाचपणी केली आहे. मात्र, काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या गटात अद्याप शांतता आहे. नेत्यांच्या या भूमिकेबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पक्ष म्हणून नव्हे, तर महाविकास आघाडीची बांधणी करण्याची नेत्यांपुढे मोठे आव्हान आहे.
सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमधील बिघाडी कार्यकर्त्यांनी उघड पाहिली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी होणार की पुन्हा बिघाड पाहायला मिळणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जयंत पाटील यांनी सध्या मोजक्याच प्रभागांवर लक्ष केंद्रित करून विजय मिळवण्याची रणनीती आखली आहे. त्यादृष्टीने कार्यकर्ते आणि नेत्यांना तसाच कानमंत्रही दिला आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत हे नेते शहरातील पक्षबांधणीकडे लक्ष कधी देणार आहेत, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. महापालिका निवडणुकांना सामोरे जात असताना शहर जिल्हाध्यक्षांची निवडही झाली नाही. नेत्यांच्या या भूमिकेबद्दल काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेस नेत्यांनीही मोजक्याच प्रभागांवर लक्ष केंद्रित करून तेथील विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
उद्धवसेनेतही अद्याप शांतताच आहे. कार्यकर्त्यांची मोठी बांधणी करण्यासाठी राज्यस्तरावरील नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्याच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांना पाठबळ मिळावे म्हणून राज्यस्तरावरून आवश्यक रसद उपलब्ध होत नाही. महापालिका निवडणुकीतील भूमिकेबद्दलही स्थानिक शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी अजूनही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही.
काँग्रेस शहर अध्यक्षाची निवड कधी?
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून हे पद रिक्त आहे. या रिक्त जागेसाठी काँग्रेसच्या माजी नगरसेवक राजेश नाईक किंवा मंगेश चव्हाण यामध्ये कोणाची निवड करायची, याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राजेश नाईक ही खासदार विशाल पाटील गटाचे, तर मंगेश चव्हाण आमदार डॉ. विश्वजीत कदम गटाचे आहेत. पाटील आणि कदम यांनी एकत्र बसून शहर जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोडवणं आवश्यक होतं. आता महापालिका निवडणुका होऊ घातल्या तरीही काँग्रेस पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष निवडीचा तिढा अजूनही सोडवलेला नाही. यामुळेही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.