BJP-leading debate in Sangli municipal council | सांगली महापालिका सभेत भाजप-आघाडीत वादंग : महापौरांच्या आसनासमोर गोंधळ; भाजपकडून मात्र समजुतीचा पवित्रा
महापालिकेच्या महासभेत सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी, सभागृहाचा अवमान झाल्याचा आरोप करीत महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली होती.

ठळक मुद्देमाजी महापौरांच्या वक्तव्यावरून गदारोळ

सांगली : महापौर-उपमहापौर पदाच्या राजीनाम्याचे सावट असलेल्या महापालिकेच्या सभेत माजी महापौर विवेक कांबळे यांनी टिंगलटवाळीचा आरोप केल्याने, विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी प्रचंड गदारोळ केला. कांबळे यांनी, सभागृहाचा अवमान केला असून माफीची मागणी करीत महापौरांच्या आसनासमोर गोंधळ घातला. त्यानंतर इतिवृत्त वाचनावरूनही आघाडीचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर धावले होते. सभेत वारंवार सत्ताधारी व विरोधकांत खटके उडाले.

महापालिका सभेत अजेंड्याव्यतिरिक्त इतर विषयावरच चर्चा रंगली होती. तब्बल तीन तासानंतरही अजेंड्यावरील विषय सुरू न झाल्याने सत्ताधारी भाजपचे सदस्यही वैतागले होते. त्यात माजी महापौर विवेक कांबळे यांनी सभागृहात टिंगलटवाळी सुरू असल्याचा आरोप केला. या आरोपावरून विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. टिंगलटवाळी हा शब्द मागे घ्या, सभागृहाची माफी मागा, अशी मागणी करीत सदस्य महापौरांच्या आसनासमोर गेले. कामगारांचे प्रश्न तुम्हाला टिंगलटवाळीचे वाटतात काय? असा सवाल विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील, विष्णू माने, योगेंद्र थोरात, अभिजित भोसले यांनी केला. महापौरांनी सर्व सदस्यांना जागेवर बसण्याची सूचना केली. पण दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या आसनासमोर गोंधळ घातला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार, गटनेते युवराज बावडेकर, पांडुरंग कोरे यांनी विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण विरोधक माफीनाम्यावर अडून होते. अखेर गटनेते बावडेकर यांनी, सभागृहात अनवधानाने शब्द गेला असेल, मी सर्वांच्यावतीने दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत यावर पडदा टाकला.

त्यानंतर इतिवृत्त वाचनावरून पुन्हा गोंधळ उडाला. विरोधकांकडून वारंवार महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली जात होती. पण सभेत महापौरांच्या राजीनाम्याचा विषय भाजपच्या अजेंड्यावर असल्याने, यावेळी सत्ताधारी सर्वच सदस्यांनी विरोधकांच्या आक्रमणाला प्रत्युत्तर न देता समजुतीचा पवित्रा घेतला होता. विषयपत्रिकेवरील काही विषय प्रलंबित ठेवत, बाकी सर्व रस्त्याच्या नामकरणाचे विषय मंजूर करण्यात आले. हिराबाग वॉटर वर्क्स इमारतीचे बांधकाम धोकादायक बनल्याने ही इमारत उतरवण्याचा प्रशासनाने आणलेला विषय महासभेने फेटाळला. यावेळी प्रशासनाने सर्व्हे नंबर चुकल्याने गोंधळ उडाला. रिसाला रोड ते शाहू उद्यानाकडे जाणारा रस्ता ३० फुटीच करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हिराबाग वॉटर वर्क्स येथील इमारत धोकादायक असल्याने ही इमारत उतरवून घेण्याचा विषय चर्चेला येताच विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी या जागेची कागदपत्रे सभागहापुढे सादर करा अशी मागणी केली, तर नगरसेवक सागर घोडके यांनी, प्रशासनाने विषयपत्रिकेवर सर्व्हे नं. ४६३ ही जागा हिराबागची दाखवली असली तरी प्रत्यक्षात हा सर्व्हे नंबर स्टेशन चौकातील विठ्ठल मंदिराचा असल्याची चूक निदर्शनास आणून दिली.

यावर आयुक्त कापडणीस यांनी, इमारत धोकादायक बनल्याने उतरवण्याचा प्रस्ताव आणला, यात कुणाचेही हितसंबंध नाहीत, रद्द केला तरी चालेल, काही घडले तर त्याची जबाबदारी स्वीकारा, असा इशाराही दिला. यावर महापौर संगीता खोत यांनी, सर्वानुमते हा विषयच रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. करीम मेस्त्री यांनी, रिलायन्स मॉलचे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले असून ते पाडण्याची मागणी केली. योगेंद्र थोरात यांनी, मृत सफाई कामगारांना दहा लाखाची भरपाई द्यावी व त्यांचा आरोग्य विमा उतरविण्याची मागणी केली.

 

  • आयुक्तांचा सदस्यांना दम

सभेत तीन तास झाले तरी विषयपत्रिकेव्यतिरिक्तच चर्चा सुरू होती. त्यात प्रत्येक नगरसेवक वेगवेगळा विषय काढून अधिकाऱ्यांना, आताच माहिती द्या, अशी मागणी करीत होता. हा प्रकार पाहून आयुक्त नितीन कापडणीसही चांगलेच वैतागले. सदस्यांकडून ऐनवेळी विषय उपस्थित केले जात आहेत, अधिकाऱ्यांकडून लगेच माहिती मागितली जात आहे, त्यांना किमान थोडा वेळ तरी दिला पाहिजे, केवळ अधिकाºयांना टार्गेट केल्याचे खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्याकडे माहिती कशी उपलब्ध असेल, सभेचे कामकाज कोणत्या कायद्याने सुरू आहे, अशी विचारणाही त्यांनी नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्याकडे केली. त्यामुळे सभागृहात शांतता पसरली.

 

स्टेशन चौकालगतच्या बीएसएनएल चौकाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आणला होता. स्टेशन चौकात वसंतदादांचे स्मारक असल्याने त्याचे नाव देण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. ठाकरे यांच्याबद्दल आदर असून त्यांचे नाव अन्य चौकाला द्यावे, अशी मागणी केली. पण अ‍ॅड. स्वाती शिंदे यांनी या ठरावाचे जोरदार समर्थन करीत स्वखर्चातून नामकरण व सुशोभिकरणाची तयारी दर्शविली. अखेर महापौरांनी त्याला मंजुरी दिली.


 

Web Title: BJP-leading debate in Sangli municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.