भाजपच्या जत तालुकाध्यक्षांवर नगरसेवकाचा हल्ला : व्हसपेठजवळ घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 21:45 IST2018-09-08T21:23:22+5:302018-09-08T21:45:41+5:30
भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत शंकरेप्पा गुड्डोडगी (वय ४०, रा. सिध्दार्थ कॉलनी, जत) यांच्यावर भाजपचेच नगरसेवक उमेश जयसिंगराव सावंत (वय ३५, रा. विजय कॉलनी, जत) व अमीर (पूर्ण नाव माहीत नाही) आणि एका अनोळखीने दगड व काठीने प्राणघातक

भाजपच्या जत तालुकाध्यक्षांवर नगरसेवकाचा हल्ला : व्हसपेठजवळ घटना
जत : भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत शंकरेप्पा गुड्डोडगी (वय ४०, रा. सिध्दार्थ कॉलनी, जत) यांच्यावर भाजपचेच नगरसेवक उमेश जयसिंगराव सावंत (वय ३५, रा. विजय कॉलनी, जत) व अमीर (पूर्ण नाव माहीत नाही) आणि एका अनोळखीने दगड व काठीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवार, दि. ५ सप्टेंबररोजी पहाटे तीन वाजता व्हसपेठ-कोळगिरी रस्त्यावर व्हसपेठपासून तीन किलोमीटरवर घडली. याप्रकरणी शनिवारी जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रकांत गुड्डोडगी व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वास्टर (वय ३८, रा. जत) हे दोघे मोटारीतून (क्र. एमएच १० बीएम ४३९२) बालगाव येथे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून परतत असताना उमेश सावंत व अमीर आणि अन्य एक अनोळखी असे तिघे विनाक्रमांकाची मोटार घेऊन व्हसपेठजवळच्या डोंगर परिसरात आडवे येऊन थांबले होते. गुड्डोडगी यांची गाडी आल्यानंतर त्यांनी जोरदार दगडफेक करीत गाडीच्या सर्व काचा फोडल्या. गुड्डोडगी गाडीच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्या डोक्यात, कपाळावर, दोन्ही हात व पायावर काठ्यांनी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात गुड्डोडगी गंभीर जखमी झाले. सुनील वास्टर यांनाही मारहाण करण्यात आली.
या घटनेनंतर गुड्डोडगी यांच्यावर मिरज व जत येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गुंडरे करत आहेत.
पक्षांतर्गत वाद की वाळू व्यवसायातील संघर्ष?
चंद्रकांत गुड्डोडगी व उमेश सावंत हे दोघेही सुसलाद (ता. जत) येथील रहिवासी आहेत. या दोघांमध्ये पूर्वीपासून गावपातळीवरील राजकारण व पक्षांतर्गत वाद आहेत. याशिवाय दोघांचाही वाळू व्यवसाय आहे. व्यवसायातील संघर्षातून ही घटना घडल्याची चर्चा जत तालुक्यात आहे.