कोरोनाबाधित असतानाही वाढदिवसाच्या भोजनावळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:37+5:302021-05-07T04:29:37+5:30
मिरज : कोरोना पॉझिटिव्ह असतानाही वाढदिवस साजरा करून भोजनावळी व रक्तदान शिबिर घेणाऱ्या विजयनगर ग्रामपंचायतीचा माजी सदस्य राकेश श्रीपाल ...

कोरोनाबाधित असतानाही वाढदिवसाच्या भोजनावळी
मिरज : कोरोना पॉझिटिव्ह असतानाही वाढदिवस साजरा करून भोजनावळी व रक्तदान शिबिर घेणाऱ्या विजयनगर ग्रामपंचायतीचा माजी सदस्य राकेश श्रीपाल कुरणे याच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरणे याच्या वाढदिवसाला गावातील सुमारे दोनशे जण उपस्थित असल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे.
राकेश कुरणे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यास गावातील आशा वर्कर्स व आरोग्यसेवकांनी घरी क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, क्वारंटाईन न होता नातेवाईक व मित्रांसमवेत त्याने वाढदिवसाची जोरदार पार्टी केली. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. उपस्थितांना भोजनही देण्यात आले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अनेकांनी कुरणे याला केक भरवून आलिंगन दिले. कोरोना नियमांचे उल्लंघन सुरू असताना कुरणे यांना समजावण्यासाठी गेलेल्या ग्रामदक्षता समितीलादेखील त्याने अरेरावीची भाषा केल्याची तक्रार आहे. कुरणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर वाढदिवसाला उपस्थित असलेल्या गावातील सुमारे दोनशे जणांचे धाबे दणाणले असून गावात चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश झुगारत विनापरवाना रक्तदान शिबिर घेतले व कोरोना पॉझिटिव्ह असतानाही स्वतःचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल राकेश कुरणे याच्याविरुद्ध तलाठी सुधाकर कुणके यांनी पोलिसात फिर्याद दिली.