कमी दराच्या निविदेतील कामांची बिले दर्जा तपासूनच काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:06+5:302021-07-09T04:18:06+5:30
सांगली : कमी दराने निविदा भरलेल्या ठेकेदारांच्या कामांची नियमित तपासणी केली जाईल. दर्जा राखला नाही तर बिले काढली जाणार ...

कमी दराच्या निविदेतील कामांची बिले दर्जा तपासूनच काढणार
सांगली : कमी दराने निविदा भरलेल्या ठेकेदारांच्या कामांची नियमित तपासणी केली जाईल. दर्जा राखला नाही तर बिले काढली जाणार नाहीत, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निविदा दाखल होत आहेत. स्पर्धेमुळे तब्बल २९ टक्क्यांपर्यंत कमी दराने भरल्या जात आहेत. इतक्या कमी रकमेत भरलेल्या निविदांची कामे दर्जेदार होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले की, या कामांवर काटेकोर नजर ठेवणार आहोत. विविध टप्प्यांत कामांची तपासणी केली जाईल, त्यानंतरच बिले काढली जातील. गुणवत्ता तपासणीसाठी पाच संस्थांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालये आणि जिल्हा परिषदेच्या प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांसाठी समावेश आहे. गुणवत्ता नसल्याचे दिसल्यास बिल काढले जाणार नाही.
गुडेवार म्हणाले, यासंदर्भात ठेकेदारांकडून लेखी पत्र घेतले आहे. गुणवत्ता नसल्यास बिल मिळणार नाही, याची हमी घेतली आहे. सुमारे २५० हून अधिक कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये रस्ते व अन्य बांधकामांचा समावेश आहे.