दुचाकींची माहिती मागवली - दहशतवादविरोधी पथक :
By Admin | Updated: July 29, 2014 22:56 IST2014-07-29T22:39:39+5:302014-07-29T22:56:08+5:30
चोरीस गेलेल्या वाहनांवर लक्ष

दुचाकींची माहिती मागवली - दहशतवादविरोधी पथक :
सांगली : पुणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा वर्षात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांत चोरीस गेलेल्या दुचाकींची माहिती राज्याच्या दहशतवादविरोधी (एटीएस) पथक व गुन्हे अन्वेषण (क्राईम ब्रँच) विभागाने मागविली आहे. ही माहिती तातडीने सादर करण्याचा आदेश दिल्याने सांगलीच्या पोलीस मुख्यालयात आज (मंगळवार) गेल्या दहा वर्षातील रेकॉर्ड काढण्याचे काम सुरू होते.पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात बॉम्बस्फोट झाला होता. एका दुचाकीमध्ये स्फोट झाल्याचे आढळून आले होते. या दुचाकीच्या क्रमांकावरुन ती कऱ्हाड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र या पोलिसाची दुचाकी चोरीस गेली होती, यासंदर्भात त्याने कऱ्हाड पोलिसांत दुचाकी चोरीची तक्रारही नोंदविली होती. पुण्यात दोनवेळा बॉम्बस्फोटाची घटना घडल्याचे गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे. स्फोटासाठी दुचाकीचा वापर झाल्याच्या घटनेमुळे दुचाकी चोरीची माहिती मागविण्याचा निर्णय एटीएस व गुन्हे अन्वेषण विभागाने गेला आहे. दुचाकी चोरीच्या सातत्याने घटना घडतात. जिल्ह्यात २२ पोलीस ठाणी आहेत. दररोज एखाद्या तरी ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडत असतेच.
दुचाकी चोरीस गेल्यानंतर तक्रारदार तक्रार देण्यासाठी पोलिसात आल्यानंतर प्रथम त्याची कच्ची नोंद करुन घेतात. दोन-चार दिवस तपास केला जातो. यातूनही दुचाकी सापडली नाही, तर मग पक्की नोंद केली जाते. दहशतवादविरोधी पथक व गुन्हे अन्वेषण विभागाने चोरीला गेलेल्या दुचाकींची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील पोलिसांना दिला आहे. येत्या चार दिवसात याचा अहवाल द्यायचा असल्याने जुने रेकॉर्ड काढण्याचे काम सुरु आहे. (प्रतिनिधी)