कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी -: जिगरबाजांची किमया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 23:54 IST2019-11-11T23:52:46+5:302019-11-11T23:54:40+5:30
कर्नाळ येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुप हा गेली दोन वर्षे ‘सायकल चालवा फिट राहा’ असा संदेश घेऊन दररोज सराव करत आहे. दर रविवारी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे.

कर्नाळ ते कन्यामुमारी या मोहिमेत सहभागी झालेले रावसाहेब पाटील, संदेश कदम, राजू पाटील, अमोल पाटील व प्रभाकर आंबोळे.
सांगली : ‘से नॉट टू प्लास्टिक’ हा संदेश घेऊन कर्नाळ (ता. मिरज) येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या चार सायकलवीरांनी कर्नाळ ते कन्याकुमारी अशी साहसी १३६० किलो मीटरची अत्यंत रोमहर्षक सायकल सफर यशस्वी केली.
ग्रुपचे सदस्य रावसाहेब मोहिते (वय ५९) संदेश कदम (५४), अमोल पाटील (३४) व राजू पाटील (४४) असे चौघेजण सायकलवरून, तर या चौघांना प्रोत्साहन व आवश्यक सेवा देण्यासाठी सहकारी म्हणून प्रभाकर आंबोळे (वय ६१) या मोहिमेत सहभागी झाले होते.
कर्नाळ येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुप हा गेली दोन वर्षे ‘सायकल चालवा फिट राहा’ असा संदेश घेऊन दररोज सराव करत आहे. दर रविवारी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे. लांब पल्ल्याचा सायकल प्रवास ज्वलंत संदेश घेऊन करायचा, असा गु्रपचा संकल्प होता.
त्यातूनच पर्यावरण वाचविण्यासाठी ‘से नॉट टू प्लास्टिक’ आणि ‘सायकल चालवा फिट राहा’ हे संदेश घेऊन कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल प्रवास करण्याचा संकल्प त्यांनी केला. दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता गावातील हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून सुरुवात झाली. गावातील शेकडो तरुण प्रोत्साहन देण्यासाठी सायकलवरून सांगलीच्या गणपती मंदिरापर्यंत आले. तिथून स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या चौघांनी पुढचा प्रवास सुरू केला.
लोकांशी संवाद साधत अत्यंत शिस्तबध्दपणे सायकलवीर प्रवास करत गेले. हत्तरगी (बेळगाव), शिग्गाव, चित्रदुर्ग, तुमकूर, होसूर, सेलम, वेदसुंदर (दिंडीगल), मदुराई, तिरुनेलवेल्ली असे नऊ मुक्काम त्यांनी केले आणि दहाव्यादिवशी सकाळी १२ वाजता कन्याकुमारी येथे पोहोचले. महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू या तीन राज्यांतून १३६० किलोमीटरचा सायकल प्रवास त्यांनी केला. अनेकांचा आत्मविश्वास वाढविणारा आणि सायकलिंगचे महत्त्व वाढविणारा हा प्रवास ठरला आहे.
विविध ठिकाणी सांगलीकरांनी केले स्वागत
या सायकलपटूंचे कर्नाटक व तामिळनाडूतील महाराष्टयन लोकांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. त्यांच्या मोहिमेचे कौतुक केले. त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची सोय केली.
सायकल ग्रुप सुरू केल्यापासून गावातील अनेकजण सायकल चालवत आहेत. दर रविवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सायकलद्वारे भेटी देण्याचा उपक्रम पहिल्यांदा हाती घेतला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. गु्रपमधील काहीजणांचा मधुमेहाचा त्रास पूर्णपणे बरा झाला आहे. कर्नाळ ते कन्याकुमारी या प्रवासातून ‘प्लास्टिक वापरू नका’ संदेश आम्ही पोहोचविला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास आपण करू शकतो, हा आत्मविश्वास आला. खूपच सुखद, साहसी व प्रेरणादायी असा हा प्रवास होता.
- राजू पाटील, कर्नाळ