दुधोंडीत भोंदू ‘डॉक्टर’चा पर्दाफाश
By Admin | Updated: August 23, 2015 23:38 IST2015-08-23T23:37:22+5:302015-08-23T23:38:41+5:30
‘अंनिस’ची तक्रार : दारू सोडविण्याच्या आमिषाने ‘पानाचे औषध’

दुधोंडीत भोंदू ‘डॉक्टर’चा पर्दाफाश
कुंडल : खाऊचे पान देऊन दारू सोडण्याचे औषध म्हणून भोंदूगिरीचा प्रकार करणाऱ्या व ‘मेजर डॉक्टर’ या नावाने परिचित असणाऱ्या हणमंत रंगराव बजबळे (रा. कुुपवाड) व त्याला मदत करणाऱ्या आशिष आप्पासाहेब वालेकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर दुधोंडी (ता. पलूस) येथे कुुंडल पोलिसांनी पकडले.
मेजर डॉक्टर या नावाने बजबळे गेली अनेक वर्षे दारू सोडण्याचे औषध द्यायचा. त्याचा वावर महाराष्ट्राच्या विविध भागात होता. केवळ पान खायला देऊन दारू सोडवतो, अशी त्याची प्रसिद्धी होती. यासाठी तो दरबार भरवत असे. या दरबारात प्रारंभी ‘दारूचे दुष्परिणाम’ यावर प्रवचन देत असे व माझ्या औषधाने दारू सुटली नाही, तर पाच लाख रुपये देईन, अशी घोषणा करीत असे. दारू सोडण्यासाठी तो एक पान तयार करून आणत असे. त्याचे वाटप दरबारात केले जात असे. पान समोर बसून खायला सांगे. त्यानंतर ५ ते ६ वेळा पान खावे लागेल, असे तो सांगत असे. लोकही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने सांगितलेल्या तारखांना त्याच्या ‘दरबारात’ हजेरी लावत असत.
सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ‘अंनिस’चे कार्यकर्ते दुधोंडी येथे दरबारात जाऊन बसले व मेजर डॉक्टर म्हणून परिचित असणाऱ्या हणमंत बजबळे त्यास मदत करणारा आशिष वालेकर यास पकडले. या दरबारात ५० ते ६० लोक होते. कुंडल पोलीस ठाण्यात आणल्यानंतर बजबळे याने शरणागती पत्करली आणि आपल्याकडे कुठलेच औषध नसल्याची कबुली दिली.
कुंडल पोलिसात त्याच्याविरोधात वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील, अॅड. चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे, जावेद पेंढारी, प्रियांका तुपलोंढे, राणी कदम, बाळासाहेब पाटील, राजू कदम, डॉ. सुरेश शिंदे सहभागी झाले होते. (वार्ताहर)
११० रुपयांना पान
दारू सोडण्याचे कोणतेही प्रभावी औषध नसताना, बजबळे हा लोकांच्या जिवाशी खेळत होता. त्यास कोणतेही वैद्यकीय ज्ञान नाही. ‘पानाचे औषध’ अशी जादुई आवई उठवून तो महाराष्ट्रात फिरत असे. ठिकठिकाणी दरबार भरवून, दारू सोडविण्यासाठी गरजूंची अक्षरश: लूट करीत असे. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने या औषधात दारू सोडण्याचे कोणतेच औषध नसून, पानात सोडा, ओवा, दगडफूल, बदामफूल, जायफळ व मेथी घालून ते पान खायला देत असल्याचे कबूल केले. एक पान ११० रुपयांना दिले जायचे, असे त्याने सांगितले.