सांगलीत २४ जानेवारीपासून भीमसेन जोशी संगीत महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:26 AM2021-01-20T04:26:18+5:302021-01-20T04:26:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संगीत क्षेत्रातील खुल्या कार्यक्रमांची मेजवानी आता सुरू झाली असून येथील स्वरवसंत ट्रस्टच्यावतीने २४ जानेवारीस ...

Bhimsen Joshi Music Festival from January 24 in Sangli | सांगलीत २४ जानेवारीपासून भीमसेन जोशी संगीत महोत्सव

सांगलीत २४ जानेवारीपासून भीमसेन जोशी संगीत महोत्सव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : संगीत क्षेत्रातील खुल्या कार्यक्रमांची मेजवानी आता सुरू झाली असून येथील स्वरवसंत ट्रस्टच्यावतीने २४ जानेवारीस भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात दिग्ग्ज कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजक बाळासाहेब कुलकर्णी व मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात दुपारी दोन ते रात्री दहा अशा दोन सत्रात संगीत महोत्सव होणार आहे. कार्यक्रमास प. पू. कोटणीस महाराज, झेंडे महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, नानासाहेब चितळे, डाॅ. अभिजीत जोशी, हरिभाऊ कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्रात मृण्मयी फाटक-सिकनीस यांचे गायन होणार आहे.

यानंतर पं. वसंत-नाथबुवा गुरव ज्येष्ठ संवादिनी वादक पुरस्कार सांगलीचे गायक, संगीतकार व हार्मोनियम वादक विकास जोशी यांना दिला जाणार आहे. या कार्यक्रमानंतर सांगलीचे युवा गायक सुकृत ताम्हणकरचे शास्त्रीय गायन होणार आहे.

दुसऱ्या सत्रात नंदिनी गायकवाड गायन सादर करणार आहेत. कार्यक्रमाची सांगता पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या मेलोडिक रिदम या अनोख्या संगीताविष्काराने होणार आहे. महोत्सवात प्रथमच कथ्थकचे सादरीकरण होणार असून पुण्याच्या प्रसिध्द नृत्यांगणा शीतल कोलवालकर यांचे कथ्थक, शाकीर खान यांचे सतार वादन, सुरंजन खंडाळकर यांचे गायन तर मिलिंद कुलकर्णी यांचे हार्मोनियम यांचा समावेश असणार आहे.

या कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी व विजय कडणे हे करणार असून ध्वनी व्यवस्था शरद शहा यांची आहे. कोरोनासंबंधी शासनाच्या नियमानुसार मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे, याची प्रेक्षकांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका कार्यक्रमाआधी एक तास अगोदर भावे नाट्यगृहावरच उपलब्ध असणार आहेत.

Web Title: Bhimsen Joshi Music Festival from January 24 in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.