रेठरेधरणच्या भावशा पाटीलला तीन वर्षांची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:51+5:302021-08-18T04:32:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील खंडागळे आणि पाटील या दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्यातून संताजी खंडागळे यांच्यावर ...

रेठरेधरणच्या भावशा पाटीलला तीन वर्षांची सक्तमजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील खंडागळे आणि पाटील या दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्यातून संताजी खंडागळे यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला केल्याप्रकरणी कुख्यात गुंड भावशा ऊर्फ भाऊसाहेब वसंत पाटील याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. चौगुले यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. सोळा वर्षांपूर्वी जानेवारी २००५ मध्ये ही घटना घडली होती.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी। १३ जानेवारी २००५ रोजी संताजी दादासाहेब खंडागळे आणि दादासाहेब रंगराव खंडागळे दुपारच्या सुमारास दुचाकीवरून शेतातून घरी जात होते. त्यावेळी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून भावशा पाटील व त्याचा चुलता हिंदुराव भानुदास पाटील या दोघांनी खंडागळे यांची दुचाकी अडवली.
यावेळी भावशाने संताजी खंडागळे यांच्या हातावर लोखंडी गजाने मारून त्यांना गंभीर जखमी केले, तर हिंदूराव पाटील कुऱ्हाड उगारून अंगावर धावून गेला होता. या दोघांविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहायक फौजदार एस. ए. शिंदे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.
फिर्यादीतर्फे सहायक सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी काम पाहिले. त्यांना खटल्याच्या कामकाजात पोलीस नाईक संदीप शेटे यांनी मदत केली. दंडाची रक्कम न भरल्यास भावशा पाटील याला तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा भाेगावी लागणार आहे.
चौकट
खुनाचा खटला अद्याप प्रलंबित
रेठरेधरण गावातील खंडागळे कुटुंब आणि भावशा पाटील यांच्यातील पूर्ववैमनस्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. बदल्याची आग मनात घेऊन धुमसणाऱ्या भावशा पाटील याने डिसेंबर २०१६ मध्ये संताजी खंडागळे यांचा घरात घुसून धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे. या खून खटल्याचे कामकाज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.