सांगली : समडोळी (ता. मिरज) येथे किरकोळ कारणावरुन एकाला काठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अजित कलगोंडा पाटील (रा. बंगले गल्ली, समडोळी) यांनी राजू भीमराव गवंडी याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पाटील व संशयित राजू हे शेजारी राहण्यास आहेत. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास संशयित हा दारु पिऊन आला व तो पाटील यांच्या मावशींना शिवीगाळ करु लागला. यावर पाटील यांनी शिवीगाळ का करतोस, असे विचारले असता, तू विचारणारा कोण, म्हणत संशयित राजूने येळवाच्या काठीने पाटील यांना मारहाण करत जखमी केले. तसेच पोलीस ठाण्यात गेलास तुला दाखवतोच, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयित राजू गवंडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.