सावधान! चटकदार चायनीज करतेय मूत्रपिंडाची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:01+5:302021-09-22T04:29:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गल्लोगल्ली फूटपाथवरील लालभडक स्टॉलवर मिळणारे चायजीन फूड म्हणजे तरुणाईचा वीक पॉईंट ठरत आहे. तडाखेबाज ...

सावधान! चटकदार चायनीज करतेय मूत्रपिंडाची हानी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गल्लोगल्ली फूटपाथवरील लालभडक स्टॉलवर मिळणारे चायजीन फूड म्हणजे तरुणाईचा वीक पॉईंट ठरत आहे. तडाखेबाज तिखटामुळे जिभेचे चोचले पुरविणारे चायनीज पोटात नाना तऱ्हेचे विकार निर्माण करत आहे. त्यामुळे चायनीजचे शौकीन होण्यापूर्वी दहावेळा विचार करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
चीनमधील मूळ चायनीज पदार्थ पोषक असले, तरी त्यांची भारतीय आवृत्ती पोटासाठी अत्यंत हानीकारक आहे. भारतीयांच्या जिभेला आवडतील असा चायनीज मेन्यू बनविला जातो. त्यासाठी अनेकप्रकारची भेसळ व रसायनांचा वापर होतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टच्या तुलनेत रस्त्याकडेच्या गाड्यांवर स्वस्तात पदार्थ देण्यासाठी दर्जामध्ये तडजोड केली जाते. मांसाहारी चायनीजमध्ये खराब चिकन मिसळले जाते. निकृष्ट दर्जाचे तेल आणि खराब भाज्यांमुळेही पोटविकारांना आमंत्रण मिळते. चायनीजमधील अजिनोमोटोमुळे पचनाचे रोग उद्भवतात. मैद्याचे पदार्थही आतड्याला चिकटून राहतात.
बॉक्स
चटकदार चायनीज करेल पोटाचे मातेरे
चायनीजमध्ये कृत्रिम रंग, शेजवान सॉस, स्टार्च कॉर्न, अजिनोमोटो, ग्लुटामेट यांचा भरमसाठ वापर होतो. त्यामुळे जठर, मूत्रपिंड व आतड्याच्या विकारांना आमंत्रण मिळते. अर्धेकच्चे शिजवलेले चिकन, मांस, नुडल्स पचायला जड असतात. खाताना चटकदार लागले तरी पोटाचे मात्र मातेरे करतात. पचनसंस्था बिघडवतात.
बॉक्स
घातक अजिनोमोटो
एक वर्ष वयाखालील मुलांना चायनीज पदार्थ खायला देणे अत्यंत घातक ठरते. त्यातील अजिनोमोटो थेट जठर, आतडे व मूत्रपिंडावर परिणाम करते. अजिनोमोटो म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट आहे. अजिनोमोटो कंपनीच्या नावाने ते ओळखले जाते. आठवड्यातून तीन-चारवेळा ते पोटात गेले तर हमखास आजारी पाडते.
कोट
भारतीय परंपरेच्या विरोधातील चायनीज फूड रोगांना आमंत्रण देते. रस्त्याकडे अस्वच्छतेत बनवलेले चायनीज चवीला चांगले असले, तरी पचनासाठी त्रासदायक आहे. अर्धवट शिजलेले पदार्थ शरीर पचवू शकत नाही.
- डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सांगली