सांगली : भारतात ब्युटी पार्लरमध्ये नोकरीस लावतो असे सांगून बांगलादेश येथील अल्पवयीन मुलीस आणत तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची गोकुळनगर येथून पोलिसांनी सुटका केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादीच्या ओळखीच्याच दोन पुरुष आणि दोन महिलांनी बांगलादेश येथून पीडितेला ब्युटी पार्लरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगून भारतात आणले होते. कोलकाता येथे काही दिवस ठेवल्यानंतर तिला सांगलीतील गोकुळनगर येथे आणत तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. अखेर पीडितेने केलेल्या तक्रारीनंतर तिची सुटका करण्यात आली. शहरातील रेल्वे स्थानक परिसरात राहत असलेल्या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात अडकवलं, सांगलीतून बांगलादेशी तरुणीची सुटका
By शरद जाधव | Updated: March 2, 2023 17:53 IST