उमेदवारांच्या छबीचे टी-शर्ट वापरास बंदी
By Admin | Updated: September 17, 2014 23:06 IST2014-09-17T22:42:32+5:302014-09-17T23:06:13+5:30
प्रशासकीय आदेश : कारवाईचा इशारा

उमेदवारांच्या छबीचे टी-शर्ट वापरास बंदी
मिरज : मिरजेत उमेदवारांच्या छायाचित्राच्या टी-शर्टचा निवडणूक काळात वापर व वाटप करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांनी प्रतिबंध केला आहे. गणेशोत्सव काळात मोठ्याप्रमाणात वाटप करण्यात आलेल्या टी-शर्टचा कार्यकर्त्यांनी वापर केल्यास उमेदवारांविरूध्द कारवाईचा इशारा त्यांनी दिला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रचार साहित्याची छपाई, वितरण किंवा वापर करता येणार नसल्याचे भिकाणे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सांगितले.
विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
उमेदवारांना पोलीस, परिवहन विभाग, महापालिका, महसूल या विभागांचा परवाना एकाच ठिकाणी मिळणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे. महापालिका उपायुक्त यांच्या देखरेखीखाली तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये निवडणुकीसंबंधित सर्व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी पोस्टर, बॅनर निरीक्षण पथक, चित्रीकरण सर्वेक्षण पथक, खर्च सर्वेक्षण या पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणूक काळात प्रचारासाठी केवळ तीन वाहनांची परवानगी मिळणार असून उमेदवाराला २८ लाख रूपये प्रचारखर्चाची मर्यादा असल्याचेही भिकाणे यांनी सांगितले. (वार्ताहर)
अवैध दारुसाठा जप्त
निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खॉजा वसाहतीत छापा टाकून अवैध दारूविक्री करणाऱ्या शाहरूख अस्लम शेख (वय २२) यास अटक केली. त्याच्याकडून देशी दारूच्या २५ बाटल्या जप्त करण्यात आल्या.