पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:38 AM2020-01-28T11:38:12+5:302020-01-28T11:45:08+5:30

जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना जयंत पाटील आणि अभिनेते स्वप्नील जोशी यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   Awards for those working in different fields of journalism and society | पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार

पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार

Next
ठळक मुद्देपत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार  प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील:  जयंत पाटील

सांगली : प्रशासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम सेवा मिळाली पाहिजे यासाठी आग्रही असून जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी जनतेचा समाधानाचा निर्देशांक वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन काम करतील असा विश्वास व्यक्त केला.

पत्रकार भवन येथे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटना यांच्यावतीने पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि सुप्रसिध्द अभिनेते स्वप्नील जोशी यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राजाध्यक्ष संजय भोकरे होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, प्रसार माध्यमांमधील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.


पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पत्रकारांबरोबर आपले नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले असून आपल्या यशस्वी वाटचालीत पत्रकारांची मोलाची साथ लाभली आहे. एकवेळ वर्तमानपत्र हाच माहितीचा प्रमुख स्त्रोत होता. त्यावर मोठ्या प्रमाणावर जनमत अवलंबून असायचे. आता माध्यमे अत्यंत गतीमान झाली असून बातमी व माहितीचा प्रचंड ओघ अतिप्रचंड वेगाने लोकांपर्यंत पोहोचतो आहे.

गुणवत्तापूर्ण माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसार माध्यमांमधून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसाठी आवश्यक सुविधांबाबत सकारात्मक राहू असे सांगून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली.

उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, महापूर, निवडणूक, अतिवृष्टी या सर्व कामांमध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. याचे प्रतिक म्हणून सांगली जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीने हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने लोकाभिमुख प्रशासनासाठी आणखी जबाबदारी वाढली आहे.

उत्कृष्ट सांस्कृतिक सेवेबद्दल सुप्रसिध्द अभिनेते स्वप्निल जोशी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना पत्रकार आणि कलाकार यांचे नाते अत्यंत घनिष्ट असल्याचे सांगून सांगलीच्या साहित्यिक व सांस्कृतिक भूमीत पत्रकारांनी दिलेला हा पुरस्कार असल्याने याचे महत्त्व फार मोठे आहे असे अधोरेखित केले.

या कार्यक्रमास संजय भोकरे यांनी पत्रकारांसाठी सुविधा लक्षात घेऊन मुंबई प्रेस क्लबच्या धर्तीवर सांगली येथेही प्रेस क्लब व्हावा अशी मागणी केली.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दैनिक सकाळचे घनशाम नवाथे, उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार दत्ता पाटील (दै. लोकमत, तासगाव), प्रताप मेटकरी (दै. जनप्रवास विटा), उत्कृष्ट प्रशासकीय सेवा विशेष पुरस्कार उपायुक्त स्मृती पाटील, उत्कृष्ट निवेदिता इलेक्ट्रॉनिक मिडीया पत्रकार पुरस्कार रेश्मा साळुंखे (न्यूज 18 मुंबई लोकमत), उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉ. सुबोध उगाणे, डॉ. राजीव भडभडे, उत्कृष्ट उद्योजकता सेवा पुरस्कार रविंद्र नंदकुमार अथणे (रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे), उत्कृष्ट सामाजिक सेवा पुरस्कार वृषाली वाघचौरे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी विविध क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता.
 

Web Title:    Awards for those working in different fields of journalism and society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.