विशेष व्याघ्र संवर्धन दलास केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा; मेळघाटला मंजुरी, चांदोलीबाबत दुजाभाव का?
By संतोष भिसे | Updated: November 19, 2023 17:30 IST2023-11-19T17:30:10+5:302023-11-19T17:30:54+5:30
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

विशेष व्याघ्र संवर्धन दलास केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा; मेळघाटला मंजुरी, चांदोलीबाबत दुजाभाव का?
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी येथे चितळ सोडून त्याचे प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. याला यशही येत आहे. मात्र, या वाघांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे विशेष व्याघ्र संवर्धन दल येथे कार्यरत नाही. नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्प क्षेत्राची गरज लक्षात घेऊन सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला. मेळघाट येथे हा फोर्स कार्यरत आहे मात्र चांदोली प्रकल्पात अद्याप नाही. या पथकास केंद्राकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. भविष्यात होणाऱ्या व्याघ्र पुनर्वसनाच्या दृष्टीने हे दल कार्यरत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
चांदोली व कोयना अभयारण्यातील ६९०.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रात शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित केला आहे. केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला तत्त्वतः मंजुरी दिल्यामुळे ताडोबा प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत. यातील चार वाघ चांदोली, तर चार कोयना प्रकल्प क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सह्याद्रीत वाघांची डरकाळी घुमणार आहे.
२०१० मध्ये प्रथमच वन्यजीव विभागाने ट्रांझेट लाइन पद्धतीने केलेल्या व्याघ्र गणनेत प्रकल्प म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रात सात, तर प्रकल्पाबाहेरील क्षेत्रात चार असे एकूण अकरा वाघांचे अस्तित्व असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये एका वाघाची छबी कॅमेऱ्यात टिपण्यात आली होती. केंद्राच्या व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ताडोबातील वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
मात्र, या वाघांच्या सुरक्षेसाठी असणारा स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स येथे आवश्यक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रकल्प क्षेत्रातील वाघांची संख्या लक्षात घेऊन सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला. या फोर्समध्ये १२० प्रशिक्षित वन कर्मचारी तसेच अधिकारी असतात. फोर्समुळे वन्यजीव विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या वाढून प्रकल्प क्षेत्रातील वाघांसह इतर प्राण्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. सध्या हा फोर्स मेळघाटला कार्यरत आहे, मात्र सह्याद्री अर्थात चांदोलीत अद्याप कार्यरत नाही. मंजुरी मिळूनही हा फोर्स कार्यरत नसल्यामुळे वन्यजीव कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडत आहे.
चितळ हे वाघाचे मुख्य खाद्य आहे. चांदोली जंगलात वाघ आणायचा तर त्याला चितळांची संख्या पुरेशी असणे गरजेचे आहे. म्हणून शासनाने सागरेश्वर, कात्रज , आणि सोलापूर येथून चितळ आणून चांदोली जंगलात सोडण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी आठ हेक्टर क्षेत्राला कुंपण करून चितळांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. याला यशही येत आहे.