शरद ४४५, तर सोनाक्काला २७४ चा दर
By Admin | Updated: December 2, 2014 00:20 IST2014-12-01T23:19:24+5:302014-12-02T00:20:13+5:30
जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू : द्राक्ष काढणीस वेग, व्यापारी आणि उत्पादकांचीही लगबग

शरद ४४५, तर सोनाक्काला २७४ चा दर
प्रवीण जगताप - लिंगनूर -महाराष्ट्रात नाशिकअगोदर सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ होतो, तर सांगली जिल्ह्यात आगाप द्राक्ष छाटणी घेणाऱ्या पूर्व भागातून द्राक्ष हंगामास प्रारंभ होऊन सर्वप्रथम द्राक्ष काढणी सुरू होते. काळ्या द्राक्षांना पहिल्या टप्प्यात ३६० ते ४४५ चा दर (प्रति चारकिलो) मिळाला आहे. तसेच नियमित हिरव्या पोपटी रंगाच्या जातीच्या द्राक्षांना २६० ते २७४ चा दर मिळाला आहे. तसेच दि. ३० डिसेंबर रोजी ‘लोकमत’मधून ‘लवकरच द्राक्ष हंगाम सुरू होणार’ या शीर्षकाखाली दिलेल्या बातमीनुसार हंगामासही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या वृत्ताची चर्चा होत आहे.
मिरज तालुक्यातील पूर्व भाग आणि आता त्यापाठोपाठ कवठेमहांकाळच्या उत्तर भागातील काही उत्पादक द्राक्षबागांची फळ छाटणी आॅगस्ट महिन्यात घेत आहेत. त्यामुळे द्राक्षाची फळ छाटणी घेतल्यापासून चार महिन्यात द्राक्षे काढणीस येतात. त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष काढणीस प्रारंभ झाला आहे.
तसेच यंदाच्या हंगामातील द्राक्षे पाहणीकरिता व लवकर काढणी करण्याकरिता मागील तीन दिवसांपासूनच तमिळनाडू, बेंगलोर, सेलम या भागातील नामांकित व पारंपरिक व्यापाऱ्यांनी द्राक्षबागांची पाहणी व द्राक्षबागांच्या काढणीचा एकदम जोर सुरू केला आहे. या व्यापाऱ्यांनी मागील दोन दिवसात बागांचे दर ठरवून इसारती दिल्या आहेत, तर आजपासून (दि. १ डिसेंबर) किमान भागातील दहा बागांमधून काढणी सुरू होणार आहे. तसेच एकाचवेळी द्राक्ष काढणी आणि पाहणीचा धडाका व्यापारी लावतात. त्यांच्या या लगबगीत द्राक्षोत्पादकही फोनाफोनी करून काढणीला आलेल्या बागा लवकर काढणी करून वातावरण बदलण्याअगोदर मोकळे होऊया, या मानसिकतेत असतात. परंतु या मानसिकतेचा व्यापारी फायदा उचलण्याची शक्यता असते. त्यातून दर पडू शकतात. त्यामुळे सर्वच उत्पादकांना गडबड न करता सबुरीने व दर्जानुसार दर मिळवावे लागणार आहेत.
यंदा मिरज तालुक्यातील लिंगनूर, खटाव, संतोषवाडी, सलगरे, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी, हिंगणगाव व वाळव्यातील काही द्राक्षबागांची एकाचवेळी वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी द्राक्षबागा ठरवून काढणी सुरू केली आहे. या सर्वच ठिकाणी मिळालेल्या दराचा आढावा घेतला, तर सोनाक्का, तास ए गणेश, थॉमसन या जातीच्या आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षांना ३०० चा दर मिळेल, अशी अपेक्षा होती. पण मागील पंधरवड्यापूर्वी झालेल्या पावसाने द्राक्षघडांवरील चकाकी कमी झाल्याने दरात घट होत आहे.
सध्या मालाच्या दर्जानुसार व्यापारी सर्वच जातीच्या द्राक्षांना दर देत आहेत. द्राक्षोत्पादकांनी संयमाने दराबाबत भूमिका घेतली पाहिजे. सध्याचे दर किमान पंधरा दिवस तरी टिकून राहतील, असा अंदाज आहे. पूर्व भागात या आठवड्यात द्राक्ष काढणीस वेग येईल. निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्षांना चांगले दर मिळतील.
- रुद्राप्पा ऊर्फ बंडू कोथळे, द्राक्षोत्पादक, संतोषवाडी.
आमच्या शरद या जातीच्या काळ्या द्राक्षांना ४४५ चा दर प्रतिचार किलोसाठी मिळाला आहे. तीन टप्प्यात काढणी होणार असून तिसऱ्या टप्प्यातही ४०० ते ४३५ पर्यंत दर मिळेल, अशी खात्री आहे. काही बागांतील द्राक्षांत वातावरणातील बदलाने व पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेले. त्यामुळे दरात थोडी घट मालाच्या दर्जानुसार होऊ शकते.
- गणपती मगदूम,
द्राक्ष उत्पादक, लिंगनूर
निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्षे असतील तर ३०० व काळ्या द्राक्षांना ४५० चा दरही मिळू शकेल, अशी खात्री काही उत्पादकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. लगबगीत द्राक्षोत्पादकही फोनाफोनी करून काढणीला आलेल्या बागा लवकर काढणी करून वातावरण बदलण्यापूर्वी मोकळे होऊया, या मानसिकतेत असतात. त्याचा फायदा व्यापारी उचलण्याची शक्यता असते. त्यातून दर पडू शकतात.
काळ्या द्राक्ष काढणीची लगबग
सध्या मिरज पूर्व भागातील लिंगनूरमध्ये शरद जातीच्या काळ्या द्राक्षांना एके ठिकाणी प्रति चार किलोसाठी ४४५ रुपये, खटाव सोनाक्का २६०, सलगरे २७३, शिंदेवाडी - हिंगणगाव २७०, संतोषवाडी शरद - ३६० रुपये असे दर मिळाले आहेत. त्यांच्या काढणीस आजपासून वेग येणार आहे.