अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घ्यावे...
By Admin | Updated: January 2, 2015 00:19 IST2015-01-01T23:18:58+5:302015-01-02T00:19:13+5:30
एम. आर. यादव : अन्यथा वेतन रोखणार, शाळांना इशारा

अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घ्यावे...
सांगली : समायोजन केलेल्या अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित शाळांचे वेतन रोखणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. आर. यादव यांनी दिली. यामुळे आता अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास उत्सुक नसलेल्या शाळांना तातडीने त्यांचे समायोजन करावे लागणार आहे.
माध्यमिक शाळांमध्ये ८२४ शिक्षण अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी ७२४ शिक्षकांचे संस्थाअंतर्गत समायोजन करण्यात आले आहे. उर्वरित अतिरिक्त १०१ पैकी पदवीधर ५६ शिक्षकांचे पदवीधर शिक्षकपदावर समायोजन केले आहे, तर उर्वरित ४५ पैकी बी. एड्. वेतन श्रेणीतील २७ शिक्षकांचे अन्य शिक्षण संस्थांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. डी. एड्. वेतनश्रेणीतील १८ शिक्षकांचे समायोजन अद्याप झालेले नाही. ज्या शिक्षकांचे समायोजन करण्यात आलेले आहे, त्यापैकी काही शाळांनी समायोजित शिक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ करतील, त्या शाळांचे जानेवारीचे वेतन रोखणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.
शाळांचा मातृवंदनेने प्रारंभ
भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी नववर्षारंभाच्या पहिल्या दिवशी आज जिल्ह्यातील बहुतांश सर्व शाळांमध्ये मातृवंदना उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मातेचा योग्य सन्मान राखावा, याची शिकवण विद्यार्थ्यांना मिळावी, याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला.
सहायक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड, उपसंचालक मारुती गोंधळी यांनी, हा उपक्रम सर्व शाळांनी राबवावा, या आशयाचे परिपत्रक काढले होते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १७१० शाळा असून त्यामध्ये १ लाख ३६ हजार १२५ विद्यार्थी शिकत आहेत. यापैकी बहुतांशी शाळांमध्ये आज मातृवंदनेनेच शाळेचा प्रारंभ करण्यात आला. दि. ३ जानेवारी रोजी बालिका दिन असल्याने काही शाळांमध्ये या दिवसापर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांना शाळेत येताना आईला वंदन करुन यावे, घरकामात मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. शाळांमध्ये मातांना बोलावून त्यांचा सत्कार, मातृभक्ती या विषयावर कथाकथन, ‘आई’ या विषयावर निबंध हे उपक्रम करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुन्ने यांनी दिली.