सांगली : मोठ्या संघर्षानंतर दादर-हुबळी एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडीला थांबा मिळाला होता. मात्र, येत्या ६ जानेवारीपासून पुढील आरक्षित तिकिटांची विक्री बंद करण्यात आल्याने हा थांबा नव्या वर्षात बंद हाेण्याची चिन्हे आहेत. याप्रश्नी सांगलीच्या नागरिक जागृती मंचने आंदोलनाचा इशारा दिला आहे.सांगली जिल्ह्यातील ५ तालुक्यांसाठी मध्यवर्ती असलेले स्थानक म्हणून किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित किर्लोस्कर उद्योग समूहाचा कारखानाही याठिकाणी आहे. सुमारे सात लाख लोकसंख्या किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर अवलंबून असते. किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनचे प्रति फेरी उत्पन्न हे जवळच्या सातारा रेल्वे स्थानकापेक्षा अधिक आहे. तरीही येथील स्थानकावर कोणत्याही गाडीला थांबा देताना दुजाभाव केला जात असल्याची भावना सातत्याने प्रवासी संघटना व्यक्त करीत आहेत.किर्लोस्करवाडी येथील प्रवासी संघटनांनी अनेक वर्षे प्रयत्न करून दादर-हुबळी एक्स्प्रेसचा थांबा मिळविला होता. दररोज किर्लोस्करवाडीतून पुणे, मुंबईच्या दिशेने सुमारे ८० जनरल तिकीट धारक प्रवासी प्रवास करतात. त्याचप्रमाणे किर्लोस्करवाडी येथून सांगली, मिरज, कुडची, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी या दिशेने रोज सुमारे ३५ जनरल तिकीट धारक प्रवास करतात एकूण ११५ जनरल तिकीट धारक या गाडीतून प्रवास करतात.याशिवाय २५ आरक्षित तिकिटे किर्लोस्करवाडी स्थानकावरून बुक केली जातात. इतका मोठा प्रतिसाद असतानाही या स्थानावरील या गाडीचा थांबा रद्दच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ६ जानेवारीपासूनचे पुढील आरक्षित तिकिटांचे बुकिंग उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या वर्षात या गाडीला येथील थांबा मिळणार नसल्याचे दिसत आहे.
समाधानकारक उत्तर नाहीसाखळकर यांनी सांगितले की, मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ६ जानेवारीपासून किर्लोस्करवाडीतून दादर-हुबळी एक्स्प्रेसचे बुकिंग रद्द केले आहे. प्रवासी वारंवार किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनचे हेलपाटे खात आहेत. पण ६ जानेवारी नंतरची तिकीट विक्री चालू होईल की नाही याबद्दल कोणीच समाधानकारक उत्तर देत नाहीत.
दादर-हुबळी एक्स्प्रेसला २४ डबे लावून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सोडावी व किर्लोस्करवाडीचा थांबा कायमपणे सुरू ठेवावा. हा थांबा रद्द झाल्यास मध्य रेल्वेला प्रत्येक वर्षी ५५ लाखाचे नुकसान होणार आहे. याप्रश्नी मोठे आंदोलन उभे केले जाईल.- सतीश साखळकर, अध्यक्ष, सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच