सांगलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीत घटना कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 21:13 IST2017-10-09T21:12:42+5:302017-10-09T21:13:06+5:30
विश्रामबाग येथील हॉटेल पै-प्रकाशच्यामागे अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला.

सांगलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीत घटना कैद
सांगली : विश्रामबाग येथील हॉटेल पै-प्रकाशच्यामागे अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला. सेन्सर वाजल्यामुळे चोरटे पळाले. ते सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. पंधरा दिवसापूर्वी मिरजेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करुन रखवालदाराचा खून केल्याची घटना ताजी असतानाच सांगलीतही असाच प्रकार घडल्याने पोलिस यंत्रणा चक्रावली आहे.
अॅक्सिस बँकेच्या एटीएमध्ये पहाटे तीन वाजता दोन चोरटे गेले. त्यांनी एटीएमचे यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला. पण सेन्सर वाजल्याने चोरटे सावध झाले. आपण पकडले जाऊ नये, यासाठी त्यांनी तेथून पलायन केले. अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेमुळे सेन्सर वाजल्याची माहिती मुंबईच्या मुख्य शाखेत तात्काळ समजली. त्यामुळे या शाखेतील कर्मचा-यांना विश्रामबाग पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तातडीने एटीएममध्ये दाखल झाले. पण चोरटे तत्पूर्वीच पळून गेले. एसटीएममधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. फुटेजची तपासणी केल्यानंतर दोन चोरटे दिसतात. त्यांनी चेहरे लपविले आहेत. सोमवारी दिवसभर एटीएम बंद ठेवण्यात आले होते.
तपास गतीने
मिरजेत पंधरवड्यापूर्वी बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. चोरट्यांनी रखवालदाचा खून केला होता. ही घटनाही पहाटे तीनच्या दरम्यान घडली होती. सांगलीतही याच वेळेला एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. कदाचित मिरजे घटनेतील संशयितांचा यामध्ये सहभाग असू शकतो. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे.