नागरी प्रश्नांसाठी महापालिकेवर हल्लाबोल
By Admin | Updated: July 28, 2014 23:23 IST2014-07-28T22:46:15+5:302014-07-28T23:23:14+5:30
मोर्चाद्वारे निषेध : काँग्रेस व नेत्यांना जनतेने घरचा रस्ता दाखविण्याची मागणी

नागरी प्रश्नांसाठी महापालिकेवर हल्लाबोल
सांगली : गुंठेवारी, रस्ते, गटारी, खड्डे, आरोग्य सुविधांसह विविध प्रश्नांवर आज, सोमवारी शहर राष्ट्रवादीच्यावतीने भर पावसात महापालिकेवर मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा निषेध केला. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नेते व नगरसेवकांना सत्तेची धुंदी चढली असून, त्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा इशाराही देण्यात आला. नागरी समस्या सोडविण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटमही देण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी सभापती युवराज गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक संजय बजाज, नगरसेवक राजू गवळी, बाळू सावंत, विष्णू माने, इब्राहीम चौधरी, जुबेर चौधरी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उपायुक्त सुनील नाईक यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चासमोर बोलताना दिनकर पाटील म्हणाले की, काँग्रेसला काम करण्यासाठी एक वर्षाची संधी दिली. पण वर्षभरात एक टक्काही काम झालेले नाही. शहराला गढूळ व मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. महाआघाडीच्या काळात ७० कोटींचा निधी आणून पाण्याची योजना सक्षम केली. वारणेचा वाढीव प्रस्ताव दिला होता. शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत, तर सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर डांबरी रस्ते होतात. सरसकट दोन हजार पाणीपट्टी लागू करण्यासही आमचा विरोध आहे. नवा जिझिया कर लादण्याचा डाव हाणून पाडू. रस्ते, आरोग्य, स्वच्छता या सुविधाही पालिका देऊ शकलेली नाही. गुंठेवारीत नागरिकांची दैना उडाली आहे. गुंठेवारी कायद्याचा दुरुपयोग सुरू आहे. एलबीटीवरून व्यापाऱ्यांवर फौजदारी केली जात आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालिकेचे अंदाजपत्रकही फुगविले आहे. सत्ताधारी काँग्रेसला सत्तेची धुंदी चढल्याचा आरोपही केला.
मोर्च्यात नगरसेविका संगीता हारगे, स्नेहल सावंत, अनिल पाटील- सावर्डेकर, अभिजित हारगे, राहुल पवार, मनोज भिसे, वैभव गिड्डे, योगेंद्र थोरात, राजू माळी, ओंकार मनवे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)